Type to search

जळगाव धुळे नंदुरबार

चरणमाळ घाटात अडीच लाखाची लूट

Share

नवापूर | प्रतिनिधी – सुरत डिस्ट्रीक्ट बँकेच्या उच्छल शाखेतून काढलेले २ लाख २७ हजार ५०० रुपये शेतकर्‍यांना वाटपासाठी नेण्यात येत असतांना चरणमाळ घाटातील वळणावर अज्ञात तीन इसमांनी मारहाण करुन पैशांची बॅग लांबवली. याप्रकरणी टोळीच्या म्होरक्यास नवापूर पोलीसांनी अटक केली आहे. मात्र, दोन जण फरार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी व साक्षीदार हे युनिकॉर्न मोटारसायकल ( क्र. एचएम.१८- एल-६५२४) ने सहकारी दुध उत्पादक डेअरीचे शेतकर्‍यांच्या दुधाचे २ लाख २७ हजार ५०० रुपये गुजरात येथील सुरत डिस्ट्रीक्ट को.ऑप. लिमिटेड शाखा उच्छल येथून काढून शेतकर्‍यांना वाटप करण्यासाठी जात होते. दुपारी २ ते २.३० वाजेच्या सुमारास रायवणपाडा, चरणमाळ येथे जाण्यासाठी बोरझर गावाचे पुढे चरणमाळ घाटातील दुसर्‍या वळणावर जात असताना अनोळखी तीन इसम बिना नंबरची युनिकॉर्न मोटार सायकलीने त्यांचा पाठलाग करुन फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी दांडयाने मारहाण करुन त्यांच्या हातातील पैशांची बॅग बळजबरीने हिसकावून पळून गेले होते. सदर घटनेनंतर फिर्यादी गुलाब छगन मावची (वय ४५, धंदा शेती रा.रायवणपाडा,चरणमाळ ता.साक्री जि.धुळे) यांनी नवापूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने नवापूर पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयात यापुर्वी किशोर देवज्या गावीत व प्रभु होडया गावीत (दोन्ही रा.उचीशेवडी ता.नवापूर) यांना अटक करण्यात आली होती.

त्यांनी विचारपुसदरम्यान सदर गुन्हा योहान गावीत (रा.अंठीपाडा ता.नवापूर), रविदास गावीत (रा.दापूर ता.नवापूर) व सुरेश उर्फ सुर्‍या (रा.सावरट) असे पाच साथीदारांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यातील योहान गावीत, रविदास गावीत व सुरेश गावीत फरार होते. त्यातील सुरेश उर्फ सुर्‍या रमेश गावीत रा.सावरट ता नवापूर हा नेहमी नवापूर कोर्टात वावरत असून तो चांगल्या वकीलामध्ये राहतो. तो कोर्टात वावरत असल्यामुळे मला कोर्टाचे सर्व कामकाजाची माहिती असल्याने लोकांना व मित्रांना भासवून मी कोर्टात काम करतो, तुम्ही काहीपण काम करा मी तुम्हाला सोडवून आणेल असे सांगत असे.गुन्हा कसा करायचा याबाबत तो आपल्या साथीदाराना प्लॅन आखून द्यायचा, ज्या दिवशी यातील दोन आरोपी अटक झाल्याचे समजताच तेव्हापासून तो नवापूर शहरातून व राहत्या गावातून फरार होता.

त्याच्या शोधाकरीता शोधपथक तयार करुन बातमीदार नेमून शोध घेत होतो. दि.१६ जुलै २०१९ रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक सोबत सावरट गावी त्याच्या राहत्या घरी जाऊन सापळा रचून मोठया शिताफिने आरोपी सुरेश यास ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला येऊन त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्यास गुन्हयासंदर्भात विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचे साथीदार किशोर देवज्या गावीत, प्रभु होडया गावीत, दोन्ही रा.उचीशेवडी ता.नवापूर, योहान गावीत रा.अंठीपाडा ता.नवापूर रविदास गावीत रा.दापूर ता.नवापूर अशांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. उर्वरीत दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध चालू आहे.

सदर कारवाई पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार, पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक दिपक पाटील, पो.कॉ.अनिल राठोड, योगेश थोरात, हितेश पाटील, प्रशांत यादव, दिलवर पावरा यांनी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!