Type to search

नंदुरबार

चरणमाळ घाटात जबरी चोरी करणार्‍या दुसर्‍या आरोपीला अटक, तिघे अद्यापही फरार

Share

नवापूर । प्रतिनिधी – नवापूर-पिंपळनेर रस्त्यावर चरणमाळ घाटात जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दुसर्‍या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून 50 हजार रुपये रोख, 6 हजार रुपये किंमतीचे एल.ई.डी. टिव्ही व दोन मोटारसायकली जप्त करण्यात आली. यातील तिघे आरोपी अद्यापही फरार आहेत.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.12 मार्च रोजी रायवणपाडा, चरणमाळ ता.साक्री येथील गुलाब छगन मावची हे सहकारी दूध उत्पादक डेअरीचे पैसे घेवून जात असतांना नवापूर ते पिंपळनेर रस्त्यावर चरणमाळ घाटात अज्ञात तीन जणांनी फिर्यादीस पाठीमागून येवून लाकडी काठीने मारहाण करुन जबरीने पैसे हिसकावून नेले. म्हणून गुन्हा दाखल होता. या दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना महामार्गावर रस्तालूट करणार्‍या टोळीची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षक संजय पाटील, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नवले पथकासह मागील 3 ते 4 महिन्यांपासुन सदर टोळीवर लक्ष ठेवून होते. परंतु आरोपी सतत त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, मोटारसायकली, मोबाईल नंबर आदी बदलत असल्यामुळे त्यांना पकडण्यात यश येत नव्हते. दि.2 जुलै रोजी पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना चरणमाळ घाटातील रस्तालुटीतील मुख्य सुत्रधार किशोर देवज्या गावीत, रा.उचीशेवडी ता. नवापूर हा त्याच्या शेतात लपून बसलेला आहे, अशी गोपनिय माहिती मिळाली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उचीशेवडी गावातील आरोपीताच्या शेताच्या आजुबाजुच्या परीसरात सापळा रचला. आरोपी किशोर देवज्या गावीतला ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने त्याचे साथीदार प्रभु होडया गावीत रा.उचीशेवडी ता.नवापूर, योहान गावीत रा.अंठीपाडा ता.नवापूर, रविदास गावीत रा.दापूर ता.नवापूर व सुरेश उर्फ सुर्‍या रा.सावरट अशांनी मिळुन गुन्हा केल्याची कबुली दिली. त्या अनुषंगाने उर्वरीत आरोपींचा शोध घेण्यासाठी शोध पथक तयार करुन रवाना होऊन शोध घेतला असता प्रभु होडया गावीत रा.उचीशेवडी ता.नवापूर यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयात चोरीस गेलेले मुद्देमालापैकी किशोर देवज्या गावीत याच्याकडुन 10 हजार रुपये रोख व 6 हजार रुपये किंमतीचा एल.इ.डी.टिव्ही संच हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपी प्रभु होडया गावीत यांनी त्याच्या हिस्स्याला आलेल्या 50 हजार 500 रुपयांपैकी 40 हजार रुपये काढुन दिल्याने सदर गुन्हयात एकुण 50 हजार रुपये रोख 6 हजार रुपये किंमतीचा एल.इ.डी.टिव्ही व गुन्हा करतांना वापरलेली दोन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. उर्वरीत तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध चालू आहे. सदर कारवाई पोलिस अधिक्षक संजय पाटील, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर नवले,पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील, दिगंबर शिंपी, शिवाजी नागवे, असई कृष्णा पवार, पो.हे.कॉ. महेंद्र नगराळे, दादाभाई वाघ, गुमानसिंग पाडवी, प्रविण मोरे, योगेश थोरात, अनिल राठोड, जितेंद्र तोरवणे, स्था.गु.शा.चे पंढरीनाथ ढवळे, दिपक गोरे, राहुल भामरे, वसंत नागमल, जयेश बाविस्कर, मोहन साळवे, मुकेश पवार या कर्मचार्‍यांनी तपासकामी मदत केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!