Type to search

maharashtra नंदुरबार

घाटातील माकडांची तहानभूक शमविणारे बसवाहक ‘अहिरे मामा’

Share
प्रकाश खैरनार
नवापूर । पशु-पक्ष्यांवर प्रेम करा, त्यांच्या भावना लक्षात घ्या, त्यांच्यावर प्रेम करा असे अनेकवेळा ऐकायला मिळते, वाचायला मिळते. परंतू प्रत्यक्षात पशुपक्ष्यांवर प्रेम करणे बोटावर मोजण्याएवढेच सापडतील. अशाच मोजक्या लोकांमधील एक म्हणजे येथील एस.टी.महामंडळाचे वाहक सुरेश अहिरे उर्फ अहिरे मामा होय. अहिरे मामांनी घाटावर असलेल्या माकडांना दररोज पाणी आणि फळे देवून त्यांची तहानभुक मिटविण्याची दिनचर्याच सुरु केली आहे.

चालक व वाहक म्हटले म्हणजे आपली ड्यूटी एकदाची कधी संपेल आणि कधी आपले घर गाठू अशी दिनचर्या करणारे बहुतांश पहायला मिळतात. परिवहन महामंडळाची नोकरी असो का मग खाजगी वाहनावर नोकरी करणारे चालक वाहक असो दिवसाची सुरुवात झाली म्हणजे ड्यूटी मग दिवाळी असो दसरा असो का मग गणपती असो का नवरात्री कोणत्याही सणाच्या आनंदाला मूकणारे हे सेवाभावी माणसे वारा, ऊन, पावसातही आपला दिनक्रम सुरुच ठेवत असतात. परंतु हे सर्व करून प्राणीमात्रांची सेवा करणारे नवापूर आगारातील वाहक सुरेश अहिरे जे अहिरे मामा म्हणून पूर्ण विभागात परिचित आहेत. उन्हाळ्यात प्रत्येक जण आपापल्या घरात किंवा शेतात जनावरे, पशु पक्षीची चारा पाण्याची व्यवस्था करतात. परंतु सूरेश अहिरे यांनी चक्क घाटातल्या माकडांना पाणी व फळे देउन या घाटातल्या माकडांची तहान भूक मिटविण्याचा विडा उचलला आहे.

नवापूर-अहवा रस्त्यावर नवापूरपासून सुमारे 15 ते 20 कि.मी. अंतरावर असलेल्या व दोन राज्यांच्या सिमेवर असलेल्या उकाळापाणी जंगलात एक मोठा घाट आहे. या घाटात आजुबाजूला दगडी पहाड असून खोल दरी आहे. या घाटातील सुकलेल्या झाडावर अनेक माकड व त्याची लहान लहान पिल्ले आहेत. या माकडांना या सूनाट जागेवर पाणी व अन्न मिळणे कठीण नव्हे तर अशक्य अशी गोष्ट आहे. या घाटाच्या दरीत एक नाला जातो. जेमतेम पाणी मिळते, परंतु फळांचे काय? झाडे सर्व सुकलेली आहेत. उन्हाळ्यात तर हा नाला तर पूर्णपणे कोरडा होतो. या माकडांना पाण्याची बोंबाबोंब होते. परंतु देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे नवापूर-आहवा बसवर ड्यूटी करणारे वाहक सुरेश अहिरे यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी माकडांची तहान भूक मिटविण्याची व सेवा करण्याची ठरविले. यासाठी त्यांनी दोन पाण्याचे टप ठेवले असून येता जाता या टपांमध्ये पाणी टाकून जातात. तसेच केळी, डांगर, आंबे आदी फळदेखील सोबत घेऊन जातात. वाहकाच्या सेवेबरोबर ते आणलेली फळे स्वतः कापतात तर रस्त्यावरील हॉटेलमध्ये किंवा हातपंप वर जाऊन स्वतः पाणी भरतात. यासाठी त्यांनी दोन हंडयाची कायमस्वरूपी गाडीत व्यवस्था केली आहे. फळांची सूविधा नवापूर व आहवा येथील फळविक्रेते यांच्याकडून फळे पुरविले जातात.

विशेष म्हणजे नवापूर-आहवा ही गाडी दिवसातून दोन फेर्‍या मारते. या दोन्ही फेर्‍यांमध्ये ही सेवा पूरविली जाते. विशेष म्हणजे जेव्हा या घाटातून जेव्हा ही गाडी जाते तेव्हा हॉर्न वाजला की आजूबाजूच्या परिसरातील सर्व माकड गोळा होतात. एवढेच नव्हे तर काही तर अक्षरशः वाट बघत बसलेले असतात. फळे जोपर्यंत पसरविली जात नाही, तोपर्यंत माकडे गंमत बघतात आणि फळ पसरविली गेली की लागलीच ती घेऊन पळतात. हा अदभुत नजारा व दृश्य पाहण्यासाठी प्रवासीदेखील आनंद घेतात. आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढतात. सूरेश अहिरे यांचा हा उपक्रम गेल्या चार महिन्यांपासून सुरू असून माकडांची सेवा करतांना त्यांच्या चेहर्‍यावर विशेष आनंद दिसतो. त्यांच्या या आनंदात व उत्साहात प्रवासीदेखील सहभागी होतात. त्यांना या मार्गावर ड्यूटी नसली तर ते या मार्गावर ड्यूटी असलेल्या सहकारी मित्रांना ही सेवा करण्याची विनंती करतात. कारण माकड हे रामभक्त हनुमानाचे रूप आहे. त्याची प्रत्यक्षपणे सेवा केल्याचा आनंद प्राप्त होतो. या उपक्रमात प्रवासीदेखील सहभागी होतात. बालकांनादेखील जवळून माकड बघायला मिळतात. अहिरे मामांचा हा स्तुत्य उपक्रम असून त्यांचे कौतुक केले जात आहे.

अतिशय तिव्र उन्हाळ्यात व या घाटात माकडांची तहान भूक मिटविण्यासाठी जो प्रयत्न केला जात आहे, तो खरोखरच स्तुत्य आहे. या सामाजिक कार्यात नवापूर आगारातील सर्व चालक वाहक व कर्मचारी सहकारी अत्यंत आनंदाने व उत्साहाने सहकार्य करतात. फळ विक्रेते हारून शेख, संजयभाई मदत करतात. राजेश जयस्वाल (होटल सुमन श्री) हे चिवडा व इतर नाश्त्याच्या वस्तूंची मदत करतात, हे कौतुकास्पद आहे.
– प्रा.सौ.कविता खैरनार, प्रवासी

माकडाची सेवा म्हणजे हनुमानाची सेवा असून हनुमानाचा अवतार असलेल्या या माकडांना पाणी व फळे वाटपाच्या अहिरे मामांचा या सत्कार्यात आमचादेखील सहभागी होणे एक नशीबच.
– राजेंद्र सांगळे, चालक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!