नगराध्यक्षपदांसाठी भाजपाच्या यादीत काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचा समावेश ?

0
नंदुरबार । दि.24 । प्रतिनिधी-येथील पालिकेच्या निवडणूकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे.
भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या यादीत काँग्रेस पक्षाच्या दोन माजी नगरसेवकांचेही नाव असल्याची चर्चा आहे.
येत्या नोव्हेंबर महिन्यात जिल्हयातील नंदुरबार, नवापूर व तळोदा पालिकांच्या निवडणूका होवू घातल्या आहेत. यंदा नगराध्यक्ष निवड ही थेट नागरिकांमधून होणार असल्यामुळे अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
राजकीय पक्षाच्या नेत्यांनी निवडणूकीची तयारी वर्षभरापासूनच सुरु केली आहे. नंदुरबारचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण गटासाठी असल्यामुळे या पदासाठी विविध पक्षांकडून वेगवेगळया नावांची चर्चा ऐकायला मिळू लागली आहे.

याशिवाय अनेक हौशे गवशेदेखील निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून विद्यमान नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांच्या नावावर तर शिक्कामोर्तब झाले आहे.

मात्र, भाजपाकडून अद्याप नगराध्यक्षपदासाठी उमेदवार कोण राहील याबाबत अनभिज्ञता आहे. हिरा गृपचे अध्यक्ष तथा अमळनेरचे अपक्ष आ.शिरीष चौधरी यांचे मोठे बंधू डॉ.रविंद्र चौधरी यांचे नाव भाजपाकडून आघाडीवर असले तरी त्यांनी अद्याप भाजपात प्रवेश केलेला नाही.

त्यामुळे ते भाजपाकडून लढतील की अपक्ष याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. भाजपाकडूनदेखील त्यांच्या उमेदवारीबाबत अद्याप एकमत झालेले दिसत नाही.

उपलब्ध माहितीनुसार, भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी शहरातील काही प्रतिष्ठीतांची यादी तयार करण्यात आली आहे.

या यादीत काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकाचा समावेश असल्याचे समजते. हे माजी नगरसेवक काँग्रेसच्या विरोधात तेही नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढतील काय? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

हे दोन माजी नगरसेवक कोण याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे. एवढे मात्र, खरे येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या नगरपालिका निवडणूकीत चुरस नक्कीच निर्माण होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*