नागन प्रकल्पग्रस्त जलसमाधी घेणार

0
नंदुरबार । दि.24 । प्रतिनिधी-नागन मध्यम प्रकल्पातील विस्थापितांचे प्रलंबित मागण्या पुर्ण न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नागन मध्यम प्रकल्प योजनेमुळे विस्थापित ग्रामस्थांचे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंदर्भात तातडीने दखल घेऊन संबंधीत अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
दि.6 रोजी रंगावली सभागृहात संबंधीत सर्व विभागाच्या अधिकार्‍यांना बैठकीत माहिती देवून कार्यवाहीच्या सूचना दिल्या. धुळे मध्यम प्रकल्प-2 नंदुरबार कार्यालयामार्फत महत्तम पूर पातळी आणि बुडीत क्षेत्र (घरे, शेती) याबद्दल फेर सर्वेक्षण करण्यासाठी प्रस्ताव 14 महिन्यांपूर्वी जळगांव येथे अधिक्षक अभियंता यांना पाठविला असून त्वरीत मंजूर करून घ्यावा.

पुनर्वसित गावठाणामधील मुलभूत भौतिक सुविधांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम, रस्ते व गटार दुरूस्ती, शाळा दुरूस्ती आदी सर्व कामे त्वरीत करून द्यावी.

महत्तम पुरपातळीमुळे बाधित होणारे घरे, शेती यापैकी मान्य तथा नियमानुसार बाधित घरांचे पुनर्वसन (126 घरे) आणि बुडीत क्षेत्रात बाधित झालेली शेती याबाबत पुनर्वसनाचे कामास सुरूवात करावी.

स्मशानभूमीच्या जागेबाबत संबंधितांशी आणि उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याशी चर्चा करावी. जागेची मोजणी करून मोबदला देऊन पूर्ण करावीत.

पुनर्वसित केली आणि केलीपाडा या पाड्यांना जोडणारा पूल पावसाळ्यात पाण्याखाली गेलेला होता. सिंचन विभागाने पुर्वकल्पना देऊनदेखील पूल बांधला नाही.

त्यामुळे तो दरवर्षी 12 फुट पाण्याखाली राहणार आहे रहदारी बंद होणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी तो एकमेव पूल असल्याने या पूलाबाबत तातडीने निर्णय घ्यावा.

पर्यायी पूल किंवा साईट बदलून किंवा याच पूलाची उंची वाढवून सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी.

पुनर्वसित गावांना जोडणार्‍या रस्त्यांची कामे पूर्ण करावी. नागन पुनर्वसन संघर्ष समितीने यापूर्वीच अनेक अपूर्ण बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत.

पावसाळ्यापूर्वी सिंचन विभागाने या सर्व प्रश्नांची गंभीर दखल घेऊन कार्यवाही केली नाही आणि बांधकाम विभागाने संबंधित शाखा अभियंत्यांवर निलंबनाची कार्यवाही केली नाही.

पर्यायी पुलांचे सर्वेक्षणासह पुलाची उंची वाढविण्याची प्रक्रिया सुरू केली नाही. महत्तम पुरपातळीवर पाणीसाठा झाल्यावर सर्व प्रकल्पग्रस्त जलसमाधी घेऊ, असा इशारा नागन संघर्ष समितीचे दिलीप नाईक, दिवांजी गावीत, पारत्या गावीत, करम्या गावीत, कोमाजी गावीत, देवजी गावीत, रामजी गावीत, पंजू गावीत, भरत गावीत, सावित्री गावीत, राजू गावीत, सायकूबाई गावीत, दासू भिल, निमाजी पाडवी यांच्यासह सुमारे 60 ते 70 प्रकल्पग्रस्तांनी निवेदनातून दिला आहे.

 

 

LEAVE A REPLY

*