Type to search

जळगाव धुळे नंदुरबार

मोगरापाडा येथे सत्यशोधकतर्फे बारावा संघर्ष स्मृती दिन साजरा

Share

नंदुरबार | प्रतिनिधी- सुजलॉनवाले चले जाव, फॉरेस्टवाले जाव, कोई नही हटेगा, टॉवर नही बनेगा या घोषणांच्या निनादात शेतकरी कर्जमुक्ती, पीकविमा, वनहक्क याविषयी लढण्याचा निर्धार करीत काल दि.१४ जुलै २०१९ रोजी हजारो सत्यशोधकांनी बारावा संघर्ष स्मृति दिवस साजरा केला. सत्यशोधक शेतकरी सभा आणि ग्रामीण कष्टकरी सभा आयोजित या कार्यक्रमात नंदुरबार, नवापूर, साक्री, सटाणा, मालेगाव, धुळे ,औरंगाबाद  येथील  १० हजाराहुन अधिक शेतकरी आदिवासी स्त्रीपुरुष सहभागी झाले होते.

याबाबत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १४ जुलै २००७ रोजी मोगरापाडा (ता.साक्री जि.धुळे) येथे पवन ऊर्जा क्षेत्रातील सुजलान कंपनीला आदिवासींची वनहक्काची साडे सहाशे एकर जमीन पवन ऊर्जेचे पंखे उभारण्यासाठी केंद्र सरकारने दिली होती. कंपनीने लगेच हजारो झाडांची कत्तल करून त्यावर टॉंवर उभारणीचे काम सुरू केले होते. त्याविरोधात आंदोलन झाले होते. कंपनीचे कर्मचारी, महसूल खात्याचे अधिकारी, पोलीस खात्याचा बंदोबस्त घेऊन तसेच काही भाडोत्री दलाल मदतीला घेऊन टॉवर उभारणीचा विरोध मोडून काढण्यासाठी घटनास्थळी आले होते. त्यामुळे स्थानिक पर्यावरण रक्षक आदिवासी व एस.आर.पी., पोलीस यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. यावेळी लाठी हल्ला, अश्रुधूर, हवेत गोळीबार झाला होता. त्यात १८ आदिवासी जखमी झाले होते. अनेकांवर गुन्हे दाखल झाले. परंतु कंपनीला मात्र टॉवर उभे न करता हात हलवत परत जावे लागले होते. या रोमहर्षक घटनेचा दरवर्षी हजारो शेतकरी, आदिवासी एकत्र येऊन स्मृती दिवस साजरा करतात. यावर्षीही १४ जुलै रोजी बारावा स्मृति दिवस साजरा करण्यात आला.

१४ एप्रिल १९४४ रोजी धुळे जिल्ह्यातील चिमठाणा येथे स्वातंत्र्यसेनानी क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचा साडे पाच लाखाचा खजिना लुटला होता. त्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.त्यानिमित्ताने वर्षभर दर महिन्याच्या १४ तारखेला स्मृती जागर करून कार्यकर्ते स्फुर्ती घेतात. तो दिवसही यावेळी मोगरापाडा येथे साजरा करण्यात आला.

यावेळी समर भूमीला वंदन करून मिरवणुकीने सभास्थळी आल्यावर पाच तासांची जंगी सभा झाली. यावेळी झालेल्या सभेत वक्तयांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. डॉ.पायल तडवींच्या खुन्यांना शासन करा. जेष्ठ वकील ऍड. इंदिरा जयसिंग यांच्यावरील धाडीचा निषेध, प्रस्तावित वनकायदा २०१९ मंजूर करू नका. सन २००५ च्या वन हक्क कायद्याप्रमाणे दावेदारांना सातबारे उतारे द्या. सेंद्रिय शेतीची लागवड करा.दुष्काळी परीस्थीत कृत्रिम पाऊस पाडा. झाडे लावा, झाडे जगवा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी झालेल्या सभेत सत्यशोधकचे नेते किशोर ढमाले, रामसिंग गावित, करणसिंग कोकणी, लानिप नेते सुभाष काकुस्ते, सत्यशोधक  आर.टी.गावित, हिलाल महाजन, रणजीत गावित, दीपक जगताप, यशवंत माळचे, विक्रम गावित, लिलाबाई वळवी, लालाबाई भोये, मिरूलाल पवार, सुरेश मोरे, राकेश भोसले, दिलीप गावित, वनजी गायकवाड, रावजी पथवे, झीपरू महाराज आदींची भाषणे झाली. मन्साराम पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी निळूभाऊ फुले यांच्या स्मृतीदिवसानिमित्त अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे जेष्ठ नेते एन.डी.पाटील यांच्या ९१ व्या आणि बाबा आढाव यांच्या ९० व्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतनही करण्यात आले. म फुले रचित सत्याचा अखंड म्हणून समारोप झाला. तत्पूर्वी वर्षभरात मयत झालेल्या सत्यशोधक कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!