व्हॉटस् अ‍ॅप गृपवर निवडणुकीच्याच चर्चा

टिका-टिप्पणीमुळे सदस्यांची डोकेदुखी वाढली, अनेक जण गृपमधून बाहेर

0
चेतन इंगळे
मोदलपाडा, ता.तळोदा- लोकसभा निवडणुकीमुळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप वर नेहमीचे मॅसेजेस बंद होऊन केवळ निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे. यातून राजकीय टिका टिप्पणी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. अनावश्यक व त्याच्या त्या मॅसेजचा सतत मारा होत असल्यामुळे अनेक जण व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मधून लेफ्ट होतांना दिसत येत आहेत.

नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी 10 मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर प्रशासनाने प्रमुख रस्त्यावरील होर्डींग, बॅनर्स, झेंडे, जे इतर साहित्य काढण्याची कारवाई केली. मात्र व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर आयोगाचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे कार्यकर्त्यांकडून प्रचारासाठी उपयोग केला जात असल्याचे चित्र आहे. सर्वसामान्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्येही हे मॅसेजेस दिसून येत आहे.

त्यामुळे वापरकर्त्याची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. सामाजिक विषयांना किंवा ठराविक विषयांना वाहिलेल्या ग्रुपवरदेखील निवडणुकीच्या संदर्भातील पोस्ट येण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्वच ग्रुपमध्ये राजकीय पोस्टचा अतिरेक दिसून येत असून या मॅसेजेसमुळे आता लोकांचा बराच वेळही खर्च होताना दिसून येत आहे. तेच ते संदेश पाहण्यापेक्षा अनेक जण ग्रुपमधून बाहेर पडण्यातच धन्यता मानताना दिसत आहेत.

तर काही कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय ग्रुप तयार केले असून त्यावर केवळ राजकीय चर्चा झडतांना दिसत आहेत. टिकाटिप्पणी करणारे संदेशही मोठ्याप्रमाणात व्हायरल केले जात आहे. काही ग्रुपवर कार्यकर्त्यांमध्येच प्रश्न उत्तरे टिका टिपण्णी केली जात असल्याचे चित्र आहे. सततच्या व त्याच त्या मॅसेजमुळे मोबाईलची मेमरी होऊन त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्यामुळे अनेक जण वैतागून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडत आहेत.

LEAVE A REPLY

*