Type to search

तळोदा येथे 21 मे रोजी गुरुमाऊलींचा सत्संग मेळावा

maharashtra नंदुरबार मुख्य बातम्या

तळोदा येथे 21 मे रोजी गुरुमाऊलींचा सत्संग मेळावा

Share
मोदलपाडा । वार्ताहर- तळोदा येथे दि.21 मे रोजी सायंकाळी 4 वाजता होणार्‍या प.पु. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या सत्संग मेळाव्याला पन्नास हजारापेक्षा जास्त भाविक उपस्थित राहणार असून या मेळाव्याची तयारी पूर्णत्वाकडे आली असल्याची माहिती तळोदा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे देण्यात आली.

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरीप्रणित) चे प्रमुख गुरुमाऊली प.पू.अण्णासाहेब मोरे हे तळोदा येथे दि. 21 मे रेाजी येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सत्संग मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याबाबत माहिती देतांना तळोदा केंद्रातील प्रतिनिधींनी सांगितले, दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर तर्फे 21 मे रोजी सायंकाळी चार वाजता तळोदा येथे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा भव्य शेतकरी व सत्संग मेळावा आयोजित करण्यात आला आहे. परमपूज्य गुरुमाऊली धर्म, देश, प्रांत, सीमा यांच्या पलीकडे उद्बोधन करणारे मानवी जीवनाच्या सर्वांगीण परिपूर्ण विकास करण्याची सेवा सांगणारे, वास्तवातील नागरी ग्राम अभियानातून संस्कृती जपून राष्ट्रीय विकास साधण्याच्या ध्यास, विश्वकल्याण आत्मकोन्नतीसाठी अनेक यशस्वी अभियाने हजारो श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून राज्यात भारतात तसेच भारताबाहेर सेवा राबवत आहेत.

परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे तळोदा शहरात दुसर्‍यांदा सत्संग मेळावा घेत आहेत. त्यांचे नंदुरबार जिल्हयाकडे विशेष लक्ष आहे. म्हणून गेल्या चार वर्षापासून दरवर्षी ते नंदुरबार जिल्ह्यात सत्संग मेळाव्यानिमित्ताने भेट देत आहेत नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1985 साली दादासाहेब मोरे यांनी प्रथमच शहादा तालुक्यातील कळंबू येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू केले होते- गुरुमाऊलींचे 20 टक्के अध्यात्म आणि 80 टक्के समाजकारण अशी शिकवण आहे. त्यामुळे अध्यात्माबरोबरच समाजकारण मोठ्या प्रमाणावर साधले जाते. शेतीशास्त्र आयुर्वेद अध्यात्मिक वास्तुशास्त्र मानवाच्या विविध समस्या गुरु प्रधान प्रणालीअंतर्गत ग्राम अभियान स्वयंरोजगार शेतीसाठी आधुनिक तंत्र शेतीचे वास्तुशास्त्र, पर्जन्यदेवता, उपासना या विषयांवर परमपूज्य गुरुमाऊली मार्गदर्शन करणार आहेत. दि.21 मे रोजी सायंकाळी चार वाजता गुरुमाऊलींचे तळोदा शहरात आगमन होणार आहे. त्यानंतर काही मान्यवर आपले मनोगत व्यक्त करतील. सायंकाळी सहा वाजता त्यांचा सत्संग सुरू होईल. साडेसात वाजेपर्यंत ते मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याची तयारी पूर्णत्वाकडे आली आहे. मेळाव्यास सुमारे 50 हजारापेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आसनाची तसेच पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. मेळाव्याच्या ठिकाणी मोबाईल, शौचालय, भोजन व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, ताकाची व्यवस्था, दवाखान्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हजारो स्वयंसेवक मेळाव्याप्रसंगी सेवारत राहणार आहेत, अशी माहिती तळोदा केंद्राकडून देण्यात आली आहे.

मेळाव्यासाठी तळोदा येथे विविध तयारी वेगात सुरू असून प्रशासनाकडूनही उपक्रमाचा आढावा घेण्यात येत आहे. सत्संग मेळाव्याच्या जिल्ह्यासह परजिल्हा व परराज्यातील भाविकांनी लाभ घ्यावा व परमपूज्य गुरुमाऊलींच्या विचारांचे सिंचन आपण आत्मसात करून जास्तीत जास्त भाविकांनी आपले जीवन उन्नत करून घ्यावे व सत्संगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तळोदा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

सत्संग मेळावा हा शहरातील भारत ऑईल मिल हातोडा रोड येथे होणार्‍या सत्संग मेळाव्यात गुरुमाऊली हे विवाह, संतती, शिक्षण, नोकरी, कर्ज, निवारण मनशांती, वास्तुशास्त्र, गर्भसंस्कार, बालसंस्कार, आयुर्वेदिक आदर्श शेती, भारतीय संस्कृती सण, वार व्रत वैकल्य अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करणार असल्याने या मेळाव्यात सर्व भाविकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन तळोदा येथील श्री स्वामी समर्थ केंद्र येथील आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने संपूर्ण भारतात व भारताबाहेर सहा हजारापेक्षा अधिक श्री स्वामी समर्थ केंद्र सक्रिय असून लाखो महिला पुरुष सेवेकरी कार्यरत आहेत. विविध नैसर्गिक व मानवनिर्मित समस्यांपासून मानवाला वाचवण्यासाठी सेवा मार्ग काम करीत आहे. गुरुमाऊली देशभर सत्संग मेळाव्यांचे आयोजन करून त्याद्वारे सामान्यातील सामान्यांचे दुःख वेदना, अडीअडचणी दूर करण्याचे काम करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!