मांडवी येथील वनजमिन परत मिळण्यासाठी 3 जुलैला उपोषण

0
नंदुरबार । प्रतिनिधी-धडगांव तालुक्यातील मांडवी बु. येथील वनजमिन मुळ खातेदाराला मिळावी यासाठी दि. 3 जुलै रोजी अण्णा हजारे समर्थक तथा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे कार्यकर्ते व अन्यायग्रस्त खातेदार तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. याबाबत तहसिलदारांना संबंधित खातेदारांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धडगांव तालुक्यातील मांडवी बु. येथील रहिवाशी कै.डेटका दुबल्या भिल यांना वनजमिनीच्या जुने सर्वे नंबरप्रमाणे सर्व्हे नं. 124 या क्षेत्रातील 8 एकर जरीब खर्डा जमिन सन 1947 साली ब्रिटीश सरकारकडून कबुलायतने मिळाली होती.
त्यांनी स्वकष्टाने केलेल्या वेठबिगारी कामासाठी ही जमिन त्यांना देण्यात आली होती. तेव्हापासून ते आाजतागायत त्यांचे कुटूंबिय ही जमिन खेडत आहे.

वनजमा भरून त्याची पावतीदेखील ते घेत आहे. या सर्व्हे नंबरच्या शेतजमिनीत विविध झाडे असून तेथे कायमस्वरूपी घरदेखील बांधण्यात आले.

याबाबत 1986 साली धडगांवच्या तहसिलदारांनी पाहणी करून डेबक्या दुबल्या भिल यांना दोन हेक्टर व खेत्या डेडका भिल यांना एक हेक्टर 20 आर ही जमिन देण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार या जमिनीला 147 हा सर्वे क्रमांक देण्यात आला आहे. तशी नोटीस खेत्या डेटका भिल यांना सन 2002 मध्ये धडगांव तहसिलदारांनी दिली आहे.

असे असूनही या जमिनधारकांवर अन्याय होत असून त्यांना या जमिनीपासून भुमीहीन केले जात आहे. त्यामुळे या विरोधात अन्यायग्रस्त परिवारासह अण्णा हजारे समर्थक येत्या 3 जुलै रोजी तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे.

या निवेदनावर अण्णा हजारे समर्थक भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे अध्यक्ष फेंदा पारशी पावरा, सुकलाल महार्‍या पावरा, विजय रमेश पावरा, लाला वेस्ता पावरा, भिमसिंग पराडके आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

LEAVE A REPLY

*