नंदुरबार लोकसभेतील लढत रंगतदार होणार!

डॉ.सुहास नटावदकर यांची उमेदवारी कायम, 11 उमेदवार रिंगणात

0
नंदुरबार । नंदुरबार लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी प्रामुख्याने काँग्रेसचे अ‍ॅड. के.सी.पाडवी व भाजपाच्या खा.डॉ.हिना गावीत व अपक्ष उमेदवार डॉ.सुहास नटावदकर अशी तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.

नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी आज दि. 12 एप्रिल रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्याचे लक्ष लागून होते. आज दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने लोकसभा निवडणुकीत 11 उमेदवार रिंगणात उभे आहेत. नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी प्रामुख्याने काँग्रेसतर्फे अ‍ॅड.के.सी.पाडवी, भाजपातर्फे खा.डॉ.हिना गावीत व अपक्ष उमेदवार डॉ.सुहास नटावदकर यांच्या चुरशीची लढत होणार आहे. डॉ.सुहास नटावदकर माघार घेतील याबाबत कयास लावण्यात येत होता.

मात्र डॉ.नटावदकर यांनी उमेदवार अर्ज माघार न घेतल्याने खा.डॉ.हिना गावीत यांची डोकेदुखी वाढणार आहे. भाजपातर्फे दि.8 एप्रिल रोजी खा.डॉ.हिना गावीत यांची उमेदवारी दाखल करण्यात आली होती. त्यावेळी नंदुरबारमध्ये भाजपाचे संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे ना.गिरीष महाजन नंदुरबारमध्ये असतांना अपक्ष उमेदवार म्हणून डॉ.सुहास नटावदकर यांनी अर्ज दाखल केला होता. ना.महाजन हे सुध्दा डॉ.नटावदकर यांना उमेदवारी दाखल न करण्यासाठी परावृत्त करू शकले नाही. डॉ.सुहास नटावदकर यांचे जिल्ह्यात शैक्षणिक जाळे मोठे आहे. डॉ. नटावदकर यांनी 2004 व 2009 मध्ये लोकसभा निवडणुक लढविली आहे. 2004 मध्ये त्यांना 2 लाख 44 हजार 290 मते मिळाली होती. तर 2009 मध्ये त्यांना 1 लाख 95 हजार 997 मते मिळाली होती. डॉ.सुहास नटावदकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतांना माजी आ.डॉ.नरेंद्र पाडवी, भाजपाचे ज्येष्ठ नेते कुवरसिंग वळवी उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ.सुहास नटावदकर यांच्या उमेदवारीमुळे कोणाला किती फटका बसतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे नंदुरबार लोकसभा निवडणकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*