शहादा येथे शंभरावर कावळयांचा मृत्यू, बर्ड फ्ल्यूची भिती

0

शहादा | ता.प्र. :  येथील महात्मा गांधी उद्यान परिसरात आज सायंकाळी साडे सात वाजेपासून अचानक कावळ्यांचा परिसरात गोंगाट सुरु झाला. बघताबघता झाडावरील एका मागे एक कावळे तडफडत मरु लागले. ही घटना परिसरातील काही नागरीकांचा निदर्शनास येताच त्यांनी एकच धावपळ सुरु केली.

रात्री साडे आठ वाजेपावोतो शंभरावर कावळे मरण पावले आहेत. या मृत कावळयांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यांचा व्हिसेरा विभागीय रोग अन्वेषण शाळा नाशिक येथे पाठविण्यात येणर आहे. त्यानंतर कावळयांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र, कावळयांच्या मृत्यूमुळे बर्ड फ्ल्यूची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

शहादा पालिका रुग्णालयाजवळ असलेल्या गांधीनगर परिसरात सायंकाळी सात ते साडे सात वाजेच्या दरम्यान परिसरातील फिरणार्‍या नागरिकांना अचानकपणे कावळांचा मोठा गोंगाट ऐकू आला. त्यांनी कुतुहलाने त्या परिसरातील कावळ्यांचे मोठे वास्तव असलेल्या झाडाकडे पाहिले असता एका पाठोपाठ एक असे अनेक कावळे झाडावरुन पडत असल्याचे निदर्शनास आले.

काही वेळातच या नागरिकांनी शहादा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाताील स्वछता निरिक्षक आर.एम.चव्हाण यांना कळविले. ते घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्यानंतर त्यांनी मृत कावळ्यांची संख्या पहाताच त्वरीत पशुवैद्यकीय रुग्णालय शहादा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.ए.आर.पाटील व टी.आर.पाटील यांच्याशी संपर्क केला. मात्र सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली.

तोपर्यंत शहरातील काही नागरीक व पत्रकार घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना त्याचे गांभीर्य लक्षात घेत त्वरीत त्या वैद्यकीय अधिकार्‍यांशी पुन्हा संपर्क साधण्याचे सांगून घटनेसंदर्भात जाणीव करुन दिली असता आम्ही येतो असे सांगून त्यांनी एखाद्या नेत्यासारखे आश्वासन दिले.

मात्र त्या परिसरात मरणार्‍या कावळयांची संख्या वाढत चालली होती. उपस्थितांपैकी काहीनी पक्षांवरील संसर्गजन्य बर्ड फ्लूसारख्या आजाराची भिती वर्तविली. काहीनी खाण्यातुन विषबाधा झाले असल्याचे सांगितले. मात्र परिसरात घटनेसंदर्भात मोठी दशहत निर्माण झाली आहे. कारण या परिसरातील झाडांवर पक्षांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने हा पक्षावरील मोठा संसर्गजन्य रोग तर नाही ना? अशी भिती वर्तविली जात आहे.

पक्षीमृत्युची माहिती मिळताच जि.प.सदस्य अभिजीत पाटील, नगरसेवक संदिप पाटील, नाना निकम, संतोष वाल्हे यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती जाणून घेतली. उशिराने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.आर.काळे, वाय.जी.देशमुख, ए.आर.पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून मृत पक्ष्यांची प्राथमिक तपासणी करुन चार पक्षांना संरक्षीत पेटीत सिल बंद करुन पुढील तपासणीसाठी व मृत्युचे कारण जाणुन घेण्यासाठी नाशिक येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र घडलेल्या घटनेची बातमी संपूर्ण तालुक्यात वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. जवळच असलेल्या महात्मा गांघी उद्यानातही कावळे मृत होत असल्याची माहिती प्रथमच तेथील नागरीक प्रभाकर गोपाळ लोहार यांनी पालिका प्रशासन व पत्रकाऱाना दिली.

मृत कावळयांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यातील चार मृत कावळे पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांचे शवविच्छेदन करुन पुढील तपासणीसाठी नाशिक येथील विभागीय रोग अन्वेषण शाळा नाशिक येथे पाठविण्यात येणार आहे.

प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच कावळयांच्या मृत्यूचे कारण समजणार आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.आर.काळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*