Type to search

maharashtra नंदुरबार

महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे दिले जाणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Share
नंदुरबार । दि.11 । प्रतिनिधी :  महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे दिल्या जाणार्‍या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षिका, आदर्श शाळा आणि प्रेरक अधिकारी या पुरस्कारांसाठी नंदुरबार जिल्ह्यातून शहादा तालुक्यातील कवळीथ शाळेचे शिक्षक मनोज पाटील, धडगाव तालुक्यातील वावी शाळेचे शिक्षक लक्ष्मीपुत्र उप्पीन, अक्कलकुवा तालुक्यातील टावली शाळेच्या शिक्षिका श्रीमती कमलताई पवार यांच्यासह नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कलमाडी, शहादा तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी एस.डी. पाटील यांची प्रेरक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील चाळीस हजारांपेक्षा जास्त शिक्षकांचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र शिक्षक पॅनल या व्हॉट्सअप गृपच्या माध्यमातून राज्यस्तरावर विविध पुरस्कारांचे वितरण दि.31 मे 2019 रोजी औरंगाबाद येथे केले जाणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे तब्बल 155 गृप असून राज्यभरातील शिक्षक, शिक्षिका, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी यांचा यात समावेश आहे. 55 शिक्षकांची टीम या ग्रुपवर नियमित विविध प्रकारची शैक्षणिक माहिती देऊन राज्यभरातील शिक्षकांना प्रेरणा देत असतात. या ग्रुपच्या माध्यमातून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रत्येक जिल्ह्यातून आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षिका, आदर्श शाळा आणि प्रेरक अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.

या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नंदुरबार जिल्ह्यातून आदर्श शिक्षक म्हणून धडगाव तालुक्यातील वावी शाळेतील उपक्रमशील शिक्षक लक्ष्मीपुत्र उप्पीन, शहादा तालुक्यातील कवळीथ शाळेचे शिक्षक मनोज पाटील, अक्कलकुवा तालुक्यातील टावली शाळेच्या शिक्षिका श्रीमती कमलताई पवार यांची निवड करण्यात आली आहे. नंदुरबार तालुक्यातील कलमाडी येथील जिल्हा परिषद शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. तर शहादा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.डी.पाटील यांची प्रेरक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

सदाशिव पाटील, देवेंद्र बोरसे आणि श्रीकांत शेंडगे यांच्या निवड समितीने संपूर्ण जिल्ह्यातून आढावा घेऊन ही निवड केली आहे. निवड झालेल्या शिक्षक व शाळेला निवडीचे पत्र निवड समिती सदस्यांनी सुपूर्द केले आहे. कुठल्याही प्रकारचे प्रस्ताव न मागता प्रत्यक्ष शाळेतील कामकाजाची माहिती घेऊन जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक संघटना व शिक्षक मित्रांच्या सल्लयाने ही निवड करण्यात आली आहे.

या पुरस्काराने सन्मानित पुरस्कारार्थ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून, अत्यंत योग्य अश्या व्यक्तींची निवड केल्याबद्दल निवड समितीचे आभार व्यक्त केले आहे. कलमाडी शाळेचे मुख्याध्यापक जे.के. बागुल, उपशिक्षिका श्रीमती कमल पावरा, खोंडामळी केंद्राचे केंद्रप्रमुख संजय कुवर, केंद्रप्रमुख श्रीराम बागुल, लिलाधर देसले, यांच्यासह शिक्षकांच्या उपस्थितीत निवड पत्रांचे वाटप करण्यात आले.

दि.31 मे रोजी औरंगाबाद येथील तापडिया मल्टीपर्पज हॉलमध्ये राज्यभरातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला शिक्षक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!