वीज मीटर बसवण्यापूर्वीच बिलांची वसुली

0
शहादा |  ता.प्र. :  वीज मिटर बसविण्यापुर्वी बिलांची वसुली आणि मिटर रिडींग न घेता अव्वाचा सव्वा बिले पाठवून ग्राहकांची लुट करणार्‍या वीज वितरण कंपनीच्या शहादा येथील कार्यालयावर नर्मदा बचाव आंदोलनाच्या वाडी, चिखली व नर्मदानगर पुनर्वसन वसाहतीतील बाधींतांनी मोर्चा नेत तब्बल ४ तास कार्यकारी अभियंताना घेराव घातला.

तसेच त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केल्याने अधिकार्‍यांची तारांबळ उडाली. अखेर त्या दोघा ग्राहकांना अधिकार्‍यांनी बिलाची रक्कम परत करीत यापूर्वी घेण्यात आलेली बिल चालू रिडींगनुसार दुरुस्ती करुन वसाहतीमध्ये सायंकाळचा बदल करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

वाडी, चिखली नर्मदानगर तर्‍हावद, पुनर्वसन वसाहतीत वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे अवाजवी विज बिलांची आकारणी सुरु आहे. वाडी येथील नर्मदा जीवन या निवासी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेतील अव्वाच्या सव्वा बिले देण्यात आली. सहा ग्राहकांना चक्क विज मिटर बसविण्यापुर्वीच बिलांची आकारणी करण्यात आली. त्यातील मालसिंग गुलाबसिंग पावरा व खेमा रेन्या पावरा या ग्राहकांनी मिटर बसविण्यापुर्वीच अवैधरित्या विज बिलाची रक्कम वसुल करण्यात आली.

कंपनीच्या ठेकेदाराकडून वसाहतीत जावून रिडींग न घेता कार्यालयात बसूनच मीटर रिडीग दाखवून अवाजवी बिले वसुल करण्याचा प्रकार सुरु आहे. शासनाने पुनर्वसन केलेल्या बाधितांकडून विजवितरण कंपनीकडून अशाप्रकारे आर्थिक लूट सुरु आहे. या संदर्भात वीजकंपनीच्या अधिकार्‍यांंकडे तक्रारी करुनही दुर्लक्ष होत असल्यांने नर्मदा बचाव आंदोलकांचा सयम तुटला. आंदोलनाच्या लतिका राजपूत, चेतन साळवे, कांतीलाल पावरा, राहत्या पावरा, सुनिल पावरा यांच्यासह कार्यकर्त्यानी आज दुपारी २ वाजता शहादा वीज कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चात विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.

आंदोलनकर्त्यानी यावेळी वीज बिलांची होळी केल्यानंतर कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.व्ही कुराडे, उपाभियंता आर.एम.मोरे यांना घेराव घातल्यानंतर कार्यकारी अभियंता भामरे आल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकानी घेतला. त्यानंतर भामरे यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली. नर्मदा जीवन शाळेचे ७६ युनिट रिडींग असताना १८३ युनिट चे बिल देण्यात आले.

शिवाय अवाजवी बिलाबाबत भामरे यांना धारेवर धरण्यात आले. त्यानंतर बिनामिटर बिल भरलेल्या त्या दोघा ग्राहकांना २२०० रुपये रोखीने परत देण्यात आले. १२ जानेवारी रोजी ठेकेदारांच्या माणसांकडून रीडिंग न घेता कंपनीचा जनमित्रानी रिडींग घेवुन यापूर्वी घेण्यात आलेली बिले १५ जानेवारीपर्यंत चालु रिडींग नुसार दुरुस्त करुन देणे, नर्मदाजीवन शाळा जीवन नगर येथील विज बिलातील स्थिर आकार कमी करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवणे, वाडी पुनर्वसन गावठाण असल्याने सायंकाळचे भारनियमनात बदल करणे बाबत प्रस्ताव पाठवणे असे लेखी पत्र कार्यकारी अभियंता यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

*