नंदुरबार येथे 20 जानेवारीपासून जिभाऊ करंडक स्पर्धा

0

नंदुरबार । येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दि.20 व 21 जानेवारी 2018 ला घेण्यात येणार आहे. नुकतीच नाट्यकमी संजय मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेच्या नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली.

निर्माण बहुउद्देशीय संस्था आयोजित राज्यपुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ यांच्या स्मरणार्थ होणार्‍या या जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे.

सदर स्पर्धा 20 व 21 जानेवारीला नंदुरबार येथील शिवाजी महाराज नाट्यगृह येथे घेण्यात येईल. या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांसह प्रोयोगिक एकांकिका, लक्षवेधी एकांकिका व प्रेक्षकांच्या पसंतीची एकांकिका यांनाही करंडकासह रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

तसेच विविध वैयक्तिक बक्षिसे देण्यात येतील, असे या बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीत उपप्राचार्य प्रा.डॉ.राजेंद्र कासार, रवींद्र कुलकर्णी, प्रवीण खरे, आशिष खैरनार, जितेंद्र जाधव, तुषार सांगोरे, समाधान सामुद्रे, रोहित गांगुर्डे, जितेंद्र पेंढारकर आदी उपस्थित होते.

स्पर्धेच्या परीक्षण मंडळात जेष्ठ नाट्यकर्मींचा समावेश राहणार आहे. गेल्या सहा वर्षात या स्पर्धेत नामवंत नाट्यकर्मीनी हजेरी लावली आहे.

त्यात जेष्ठ नाटककार गंगाराम गव्हाणकर, अभिनेता अशोक लोखंडे, अभिनेत्री नीला गोखले, नाट्यदिग्दर्शक तथा प्रशिक्षक शिवदास घोडके, सिनेदिग्दर्शक शाम रंजनकर, अभिनेता आत्माराम बनसोडे, सुरेश चिखले, गझलनवाज भीमराव पांचाळे, जितेंद्र पानपाटील, कुंदा प्रमिला नीलकंठ या जेष्ठ नाट्यकर्मींचा समावेश आहे.

या स्पर्धेत महाविद्यालय तसेच नाट्यसंस्थानी सहभाग घेऊन येथील नाट्य चळवळीला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजन समितीचे नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, राजेश जाधव, मनोज पटेल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*