टंचाई क्षेत्रात कूपनलिका घोटाळा

0
नंदुरबार / टंचाईच्या भागात कूपनलिका करण्यात घोळ केल्याप्रकरणी जीएसडीएचे उपअभियंता आर.सी. मोरे यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जी.सी. मंगळे यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत बोलतांना दिली. सभेत इतरही विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यावेळी सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी दुपारी झाली. या बैठकीत पाणीटंचाई, शिक्षक बदल्या यांसह इतर विविध विषयांवर चर्चा झाली.

सदस्य रतन पाडवी यांनी यांत्रिकी विभागाचे उपअभियंता आर.सी. मोरे याच्याविरूद्ध कार्यमुक्तीचा ठराव 21 एप्रिल 2017 च्या सर्वसाधरण सभेत करण्यात आलेला असतांना कारवाई का झाली नाही याबाबत विचारणा केली.

मोरे यांनी आदिवासी उपयोजनेंतर्गत 2016 मध्ये 862 विंधन विहिरींना मंजूरी देण्यात आली होती. परंतु सदरची नस्ती उपअभियंता यांत्रिकी यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.

जिल्ह्यातील गावांना, पाड्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काय प्रयोजन आहे. जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याचे सांगितले.

त्यामुळे उपअभियंता मोरे यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याची मागणी त्यांनी केली. कार्यकारी अभियंता भांडेकर यांनी सांगितले की, विंधन विहिरींच्या कामाची दरवाढ झाल्याने नवीन दराप्रमाणे कामे देणार. मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे फाईल सादर केली आहे.

मंजूरी आल्याबरोबर वर्कऑर्डर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी शिक्षक बदल्यांच्या चर्चेदरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील सपाटीवरील आणि महामार्गालगत असलेली 95 गावे सोप्या क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्यासह इतर सदस्यांनी केली.

भरत गावीत यांनी नवापूरसारख्या तालुक्यातही काही गावे अवघड क्षेत्रात आहेत. यातून गोंधळ होणार नाही व मार्ग काढावा, सर्वसाधारण सभा आणि स्थायी समिती सभेत ठराव करून तो शासनाकडे पाठवावा, अशी मागणीदेखील केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन यांनी यावर रिट पिटीशनचा अभ्यास करा व निर्णय घेऊ, असे सांगितले.

ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्या झाल्यानंतर जिल्हांतर्गत बदल्या होणार आहेत. त्यादेखील ऑनलाईनच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अभिजीत पाटील यांनीदेखील शहादा तालुक्यातील काही गावांचा अवघड क्षेत्रासाठी प्रस्ताव आल्यास तो स्विकारावा. कारण शहादासह तळोदा तालुक्यातील अनेक गावे ही दुर्गम भागात येतात. त्यामुळे त्यांचाही विचार व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अंगणवाडीमध्ये गरोदर महिलांना देण्यात येणारी अंडी, केळी नियमित मिळतात काय? याची चौकशी व पाहणी करण्यासाठी 1 जूननंतर पथक नेमण्यात येणार आहे. कारण अनेक अंगणवाडी सेविका या आपल्या नेमणूकीच्या अंगणवाडीच्या गावी न राहता दुसर्‍या गावी राहतात. त्यामुळे वितरण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे गैरकारभार करणार्‍यांवर लक्ष ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागुल यांनी अंगणवाडीतील बालकांना गोड शिरा, उपमा आणि शेवया दिल्या जाणार असून त्यासाठी टीएचआर पाकिटात त्यांचे पॅकिंग केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कामाचा ठेका धुळे येथील एका संस्थेला देण्यात आल्याची माहिती बागुल यांनी यावेळी दिली.

माध्यमिक शिक्षणाधिकारी घनश्याम पाटील यांना शासनाने निलंबीत केल्याने त्यांचा पदभार उपशिक्षणाधिकार्‍यांकडे सोपविण्यात येणार आहे. तसे आदेश लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मंगळे यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*