Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच नंदुरबार मुख्य बातम्या

नंदुरबार लोकसभा मतदार संघात राज्यात सर्वाधिक मतदान

Share
नंदुरबार । दि.19 । प्रतिनिधी :  नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदारांनी उत्स्फुर्तपणे येवून मतदान केले. राज्यात सर्वाधिक मतदान नंदुरबार लोकसभा मतदार संघात नोंदविण्यात आले. किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांतता होती.

नंदुरबार लोकसभा मतदार संघात नंदुरबार जिल्हयातील नंदुरबार, शहादा-तळोदा, धडगाव-अक्कलकुवा, नवापूर या चार विधानसभा तसेच धुळे जिल्हयातील शिरपूर व साक्री या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या मतदार संघात 18 लाख 70 हजार 117 मतदार आहेत. त्यापैकी अक्कलकुवा मतदार संघात 2 लाख 74 हजार 54, शहादा मतदार संघात 3 लाख 16 हजार 750, नंदुरबार मतदार संघात 3 लाख 36 हजार 175, नवापूर मतदार संघात 2 लाख 86 हजार 979, साक्री मतदार संघात 3 लाख 38 हजार 686 , शिरपूर मतदार संघात 3 लाख 16 हजार 973 मतदारांचा समावेश आहे. 2 हजार 115 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. सर्वाधिक मतदार साक्री विधानसभ मतदार संघात असून सर्वात कमी मतदार अक्कलकुवा मतदार संघात आहेत. यापैकी 68 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदारांचा प्रतिसाद

लोकसभेच्या नंदुरबार मतदार संघात मतदाराची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने विविध उपाय योजना केल्या होत्या. शहरासह जिल्ह्यातील काही मतदार केंद्रामध्ये सेल्फी पॉईंट, सखी मतदार केंद्र व आदर्श मतदार केंद्राची निर्मिती केली होती. प्रशासनाच्या या प्रयोगाला मतदारांनी भरभरून प्रतिसाद देत मतदान करून सेल्फीचा आनंद घेतला.

नंदुरबार लोकसभा मतदार संघाची आज रोजी निवडणुक झाली. या निवडणुकीत मतदारांची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने मतदार संघातील अक्कलकुवा- गंगापूर, जि.प. शाळा (116), शहादा- शहादा, शारदा हायस्कुल (177), नंदुरबार- नंदुरबार श्रॉफ हायस्कुल (354), नवापूर- नवापूर, महिला मंडळ इमारत (192)

साक्री- साक्री न्यु इंग्लिश स्कूल (276), पिंपळनेर पाटील माध्यमिक विद्यालय (113), शिरपूर- शिरपूर, सावित्रीबाई फुले शाळा (235) या सात ठिकाणी सखी मतदार केंद्रांची निर्मिती केली होती. अक्कलकुवा- देवमोगरा, जि.प.शाळा (100),शहादा- शहादा, व्ही.एन.हायस्कुल (174), नंदुरबार- नंदुरबार श्रॉफ हायस्कुल (355),नवापूर- नवापूर, सार्वजनिक विद्यालय (193),साक्री- पिंपळनेर के.एम. पाटील विद्यालय (193),शिरपूर- शिरपूर जिल्हा परिषद प्रा. शाळा (09) यासह आदर्श मतदार केंद्राची निर्मिती करण्यात आली.

सेल्फी पॉइंट

नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कुमध्ये 354 व 355, मतदार केंद्रे होते. याठिकाणी आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. यासाठी मतदार केंद्राच्या आवारात मंडप व गालीचा टाकून मतदारांचे स्वागत करण्यात आले. याठिकाणी सनईची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांना बुथपर्यंत जाण्यासाठी हिरवी मेट अंथरण्यात आली होती. मतदारांसाठी थंड पाण्याची व्यवस्था, रांगोळी काढण्यात आली होती.

ठिकाणी सखी मतदान केंद्र असल्याने यापूर्ण मतदार केंद्रातील कामकाज महिलांनी सांभाळले. श्रॉफ हायस्कुलसह, डॉ.काणे, मिशन हायस्कुल याठिकाणी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आल्याने नवमतदारांसह मतदारांनी मतदान करत सेल्फी पॉइर्ंटवर गर्दी केली होती. या सेल्फी पॉईंटवरील फोटो दिवसभर सोशल मिडीयावर झळकत होते.

सखी मतदान केंद्र

नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कुलमध्ये सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या मतदान केंद्रात सर्व महिला कर्मचारी कार्यरत होत्या. महिलांसोबत आलेल्या बालकांना या मतदान केंद्रात सांभाळण्यासाठी शालेय मुलींची नियुक्ती करण्यात आली होती.

जिल्हाधिकार्‍यांचे मतदान

नुतन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनीदेखील मतदान करुन सेल्फी पॉइंटवर सेल्फी फोटो घेतला.

चोख पोलीस बंदोबस्त

निवडणुकीत कुठलाही अनुचित प्रकार होवू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

वृद्ध व दिव्यांग मतदार

मतदानाला जाण्यासाठी वृद्ध व दिव्यांग मतदारांना पक्षाचे कार्यकर्ते तसेच घरातील सदस्य वाहनावर, खुर्चीवर किंवा धरुन मतदानस्थळी आणतांना दिसत होते.

सोमावल, ता तळोदा । वार्ताहर –

तळोदा शहरातील शेठ के डी हायस्कुल येथील मतदान केंद्रावर रणरणत्या उन्हात मतदार मतदानासाठी रांगेत बसले होते. प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारची सावलीची व्यवस्था करण्यात आली नव्हती म्हणून मतदारांच्या जिवाची लाहीलाही झाली.

नववधुचे मतदान

तळोदा तालुक्यातील दलेलपूर येथील नववधू दिव्या वसंत पाडवी यांनी बोहल्यावर चढण्यापूर्वीच मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून लग्नाआधी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

दलेलपूरचे सरपंच वसंत जादू पाडवी तथा पंचायत समितीच्या माजी सभापती रेखाबाई वसंत पाडवी यांची मुलगी दिव्या हिच्या विवाह सोमवारी मतदानाच्या दिवशी होता. शिवाय, लग्न घटिका मुहूर्तावर होते. परंतु मतदान हे या देशाचे आद्य कर्तव्य आहे, असे मानून तिने आपल्या गावातील मतदान केंद्रात जावून सकाळीच मतदान केले. तिच्या या स्तुत्य कृतीचे गावातून कौतूक केले जात आहे .

तळोदा

रणरणत्या उन्हात तळोदा शहरातील मतदारांचा उत्साह सकाळपासूनच पहावयास मिळत होता. मतदान केंद्रावर मतदान बुथसमोर लांबचलांब रांगा लावून मतदान करताना नागरिक दिसत होते.

शहादा विधानसभा मतदार संघात सकाळी 9 वाजता 4.90टक्के मतदान झाले होते. दुपारी 1 वाजता 40टक्के मतदान झाले. दुपारी 3 वाजेपर्यंत 50 टक्के मतदान झाले होते. एकीकडे मतदारांचा उत्साह दिसून येत होता तर दुसरीकडे प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. परंतु तरीही भर उन्हात उभे राहून मतदारांना मतदान करण्याची वेळ आली.

तापमानाचा पारा 44 अंशावर असतांना प्रशासनाच्या वतीने वा उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय करून देण्यात आली नाही. म्हणून मतदार राजाची जीवाची लाहीलाही झाल्याचे दिसून आले.
तळोदा शहरातील जि.प.शाळा क्रमांक 1 येथील मतदान केंद्रांवर दोन विरुद्ध पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर भिडले होते. मात्र, वेळीच पोलीसांनी हस्तक्षेप केल्याने वाद मिटला.

नागरिकांचे नाव गायब

बर्‍याच नागरिकांचे मतदार यादीतून नाव गायब झाल्याने ते आपले नाव शोधत वणवण भटकताना दिसत होते. त्यांचे नाव मतदार यादीत का नाही? याचे समाधान करून देण्यासाठी कोणतीही यंत्रणा प्रशासनाच्या वतीने कार्यान्वित नव्हती. त्यामुळे बर्‍याच मतदारांना मतदानाचा अधिकारापासून वंचित राहावे लागले .

100 वर्षीय वृद्धाचे मतदान

अक्कलकुवा येथे 100 वर्षीय ताराचंद नेमीचंद जैन, 96 वर्षीय शिवदुलारी विश्वनाथसिंह चंदेल, 93 वर्षीय भवरलाल जैन यांनी मतदानाचा हक्क बजावला.

सध्या देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा मतदान प्रक्रिया सुरु आहे. आज दि.29 अप्रैल रोजी चौथ्या टप्प्यात 9 राज्यातील 71 जागांवर मतदान घेण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रामधील 14 लोकसभा मतदार संघांवर मतदान होत आहे. त्यात नंदुरबार मतदार संघ येथे सुद्धा आज मतदान झाले. त्यात अक्कलकुवा शहरात सकाळपासून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदार उपस्थित होत होते. त्यात पहिल्यांदा मतदान करणार्‍या युवक युवतींची संख्या मोठी होती.

त्याचसोबत जेष्ठ नागरिक सुद्धा सकाळी उपस्थित होते. त्यात 100 वर्षीय ताराचंद नेमीचंद जैन, 96 वर्षीय शिवदुलारी विश्वनाथसिंह चंदेल, 93 वर्षीय भवरलाल जैन यांचा प्रामुख्याने सहभाग होता. त्यांनी एवढया वयात मतदान करून सर्वांचे आकर्षण ठरले. शहरातील सर्वात वयात वरिष्ठ ते आहे. त्याचसोबत दिव्यांग, आजारी व्यक्ति सुद्धा मतदान करण्यासाठी आले होते.

मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारची शांतता व कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिस दलासमवेत सी.आर.पी.एफ.चे जवान उपस्थित होते.

103 वयाच्या आजीबाईंचे मतदान

बामोडा येथील कुंवरबाई सदाशिव चौधरी या 103 वर्षाच्या आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला.

चार ठिकाणी मशिन बंद

नंदुरबार तालुक्यातील दुधाळे, शहादा तालुक्यातील शिरुड, तळोदा व नवापूर येथील मतदान केंद्रांवर मशिन बंद पडल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती. यावेळी किरकोळ वादही झाले. मात्र, नंतर प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!