सारंगखेडा यात्रेत ‘ऑस्कर’ चे आकर्षण

0

आरिफ शहा,सारंगखेडा, ता.शहादा । येथील घोडे बाजारासाठी प्रसिध्द असलेल्या या यात्रेत अश्व सौंदर्य स्पर्धेत सहा वेळा विजेता ठरलेला ‘ऑस्कर’ घोडा दाखल झाला आहे.

त्याला पाहण्यासाठी यात्रेकरूंची गर्दी होत आहे. दरम्यान, सारंगखेडा येथील यात्रौत्सवास 1800 घोडे दाखल झाले असून आजअखेर 386 घोडयांची विक्री झाली असून त्या माध्यमातून 87 लाख 44 हजार 100 रुपयांची उलाढाल झाली आहे.

शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील यात्रा घोडे बाजारासाठी प्रसिध्द आहे. या घोडे बाजारात राज सातपुते (रा.नगर) यांनी सहा घोडे आणले आहेत.

त्यात ऑस्कर, श्लोक, लालपरी, अ‍ॅलेक्स, राजलक्ष्मी, मस्तानी हे तीन नर तीन मादी जातीचे अश्व आहेत. या अश्वांपैकी ऑस्कर हा सगळयांचे लक्ष वेधून घेत आहे.

ऑस्कर हा अतिशय देखणा असून त्याची उंची 66 इंच आहे. इतर पाच घोडयांची उंची 64 इंच आहे. या यात्रेतील हे घोडे विक्रीसाठी नसल्याचे अश्व मालकांनी सांगितले.

त्यांना अश्वांची आवड असल्याने ते या यात्रेत आले आहेत. ऑस्कर अश्व हा तीन वर्ष वयाचा असून शुभ्र लक्षणी आहे. तसेच पंचकल्याण मारवाड जातीचा आहे.

देशातल्या अकलूज, पुष्कर आदी सहा ठिकाणी घोडे बाजारात सौंदर्य स्पर्धेत तो विजेता ठरला आहे. त्याचे या बाजारात विशेष आकर्षण राहिले आहे.

राजस्थानात ऑस्करला पाहण्यासाठी मान्यवरांनी भेट दिली होती. मुख्यमंत्री दि.8 डिसेंबर रोजी चेतक फेस्टीवला भेट देणार आहेत. त्याप्रसंगी ते ऑस्कर अश्वाची पाहणी करणार असल्याचे ऑस्कर मालक राज सातपुते यांनी सांगितले.

दरम्यान, यात्रौत्सवास सुमारे 1800 घोडे दाखल झाले आहेत. यात्रेच्या तिसर्‍या दिवशी सुमारे 64 घोडयांची विक्री झाली असून त्यातून 20लाख 77 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.

आतापर्यंत एकुण 383 घोडयांची विक्री झाली असून त्या माध्यमातून 87 लाख 44हजार 100 रुपयांची उलाढाल झाली आहे. आज पावसाने उघडीप दिल्याने यात्रेत मोठया संकेत यात्रेकरूनीं हजेरी लावली होती.

LEAVE A REPLY

*