तहसील कार्यालयात उमेदवार व समर्थकांची गर्दी-विविध परवानग्यांसाठी 369 अर्ज

0

नंदुरबार । नंदुरबार पालिका निवडणुकीसाठी तहसिल कार्यालयात विविध कार्यक्रमांची परवानगी घेण्यासाठी उमेदवार व समर्थकांनी गर्दी केली होती. आजपर्यंत प्रशासनाकडे विविध परवानग्यांसाठी 369 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

नंदुरबार नगरपालिका निवडणुकीसाठी दि.13 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर शहरात प्रचाराची रंगत वाढली आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी किंवा सभांसाठी विविध परवानग्या काढण्यासाठी आज रोजी तहसिल कार्यालयात गर्दी झाली होती. नंदुरबार पालिकेच्या होणार्‍या निवडणुकीत विविध घटनेवर प्रशासनाची नजर असणार आहे.

आचारसंहितेचे पालन करता यावे, यासोबत आपल्याकडून कुठलाही भंग होणार नाही. यासाठी उमेदवार दक्ष होवून काम करत आहे. राज्य निवडणुक आयोगाने ठरवून दिलेल्या आचारसंहितेचा कक्षात राहून निवडणुक लढविणार्‍या उमेदवारांनी प्रचार करावा.

आचारसंहितेचा पालनाबाबत आणि त्यातील तरतूदीबाबत माहिती उमेदवारांना व्हावी, यासाठी बैठक घेण्यात आली होती. यात उमेदवारांना विविध माहिती देण्यात आली. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतच प्रचार करता येणार आहे.

परवानगीशिवाय खाजगी मालमत्ताचा वापर करता येणार नाही. घरासमोर निदर्शने करणे, शासकीय इमारत व वस्तुंचा वापर, सरकारी खर्चाच्या कामाची जाहिरात आचारसंहितेत असलेल्या इतर सूचनाही देण्यात आल्या. उमेदवारांनी जाहीर सभेचे नियोजन करण्यापुर्वी दोन दिवस आधी परवानगी घेणे आवश्यक आहे. बॅनर, पोस्टर्स लावतांना संबंधित जागा मालकाची लेखी परवानगी आवश्यक आहे.

परवागनीसाठी 369 अर्ज
नंदुरबार नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराकरीता उमेदवाराकडून प्रचारसहित्याचा वापर होत आहे. त्यासाठी रिक्षावर ध्वनिक्षेपक लावून प्रचारगीत व उमेदवारांची माहिती सांगण्यात येत आहे.

त्यासोबत प्रभागात प्रचार रॅली काढणे, कार्यालयाचे उद्घाटन, प्रचार सभा, कॉर्नर सभा यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणुकीला अवघे सहा दिवस असल्याने परवानगी घेण्यासाठी कार्यकर्तांची गर्दी दिसून आली.

आतापर्यंत विविध परवानगी काढण्यासाठी विविध पक्षांतर्फे अर्ज करण्यात आले. दि.13 नोव्हेंबरपासून परवानगी काढण्यास सुरूवात झाली असून आतापर्यंत 369 अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.

त्यांना परवानगी देण्यात आली आहे. उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर या परवानगीचा ओघ वाढला असून त्यासाठी प्रशासनाने तहसिल कार्यालयात अतिरीक्त कर्मचारी नियुक्त करून टेबल लावण्यात आले आहे.

यात प्रचार रॅलीचा मार्ग कोणता पक्षातर्फे किती रिक्षा अर्जासोबत माहिती देवून अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर त्याला प्रशासनातर्फे परवानगी देण्यात येत असते. अशा विविध प्रकारच्या परवानग्या घेण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयात गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

*