तळोद्यात काँग्रेसला गड राखण्याचे तर भाजपाला काबीज करण्याचे आव्हान !

0

चेतन इंगळे,मोदलपाडा । तळोदा नगरपालिकेच्या निवडणूकीत काँग्रेसला गड राखण्याचे आणि भाजपाला गड काबीज करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची ठरणार आहे.

ही निवडणूक म्हणजे खर्‍या अर्थाने काँग्रेस आणि भाजपासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्र्र आणि गुजरातच्या सीमेवर आहे. तळोदा-शहादा या मतदार संघाचे आमदार उदेसिंग पाडवी हे भाजपाचे आहेत.

ही त्यांची जमेची बाजू आहे. काँग्रेसचे प्रतोद भरत माळी यांचा पालिकेवर वरचष्मा राहिला आहे. त्यांचे संघटन कौशल्य तसेच त्यांची समाजावरदेखील चांगली पकड आहे. पण आता कोण नगरपालिकेवर सत्ता स्थापन करतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर माघारीनंतर आता चित्र खर्‍या अर्थाने स्पष्ट झाल्याने सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शहरात भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह कार्यकर्ते व नेते हे मैदानात उतरले आहेत. प्रत्येकाकडून जोरदार प्रचार केला जात आहे.

परंतु या निवडणुकीमध्ये मुख्य लढत ही काँग्रेस आणि भाजपामध्येच राहणार आहे. या दोन्ही पक्षाच्या सोबत अनेक दिग्गज नेते मंडळी असल्याने या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळणार आहे.

तळोदा नगरपालिका प्रचारासाठी काँग्रेसतर्फे आ.चंद्रकांत रघुवंशी, शिरपूर येथील आ.अमरीश पटेल यांची सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपाकडून पालकमंत्री जयकुमार रावल, आ.एकनाथराव खडसे यांची सभा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांची सभादेखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे अजय परदेशी हे उमेदवार आहेत तर काँग्रेसकडून भरत माळी, राष्ट्रवादीकडून देवेंद्र जोहरी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

खरी लढत ही काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांमध्येच होणार आहे. नऊ प्रभागातील 18 जागांसाठी एकूण 51 उमेदवार रिंगणामध्ये उभे असून ते आपले भविष्य अजमावतआहेत. सात ठिकाणी सरळ लढत आहे तर आठ ठिकाणी तिरंगी, दोन ठिकाणी चौरंगी, तर एक ठिकाणी पंचरंगी लढत रंगणार आहे.

निवडणूक प्रचारामध्ये सर्वच पक्ष हे एकमेकांवर कोणता मुद्दा घेऊन आरोप प्रत्यारोप करतील हे येणार्‍या वेळेतच दिसणार आहे. तसेच भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे पण काँग्रेस पक्षाने अद्याप पर्यंत जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही.

काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा काय असेल याकडे शहरातील लोकांचे लक्ष लागून आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, हे सर्वच राजकीय पक्ष शहरातील लोकांना एकत्रित करण्यासाठी व आपल्याकडे वळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतांना दिसून येत आहे. पण मतदार राजा हा कौल कोणाकडे देतो हे निवडणूकीच्या निकालानंतरच समजणार आहे.

LEAVE A REPLY

*