एकच चर्चा : कोना जोर शे-कोन निवडी ?

0

दत्तात्रय सूर्यवंशी,तळोदा । गप्पा पिक-पाण्याच्या नाही, शाळा-अभ्यासाच्या नाही, घरकामाच्या, शेतीमजुरीच्या नाही, पोटा-पाण्याच्या नाही, पण ‘जोर कोणा शे भाऊ, कोण निवडी येई?’ या एकाच प्रश्नाभोवती गल्लोगल्ली, थोरामोठ्यांपासून बालगोपाळांपर्यंत चर्चा रंगू लागल्या आहेत.

पालिका निवडणूका सुरू असून उमेदवारांनी नामांकन दाखल केले, छाननी झाली, माघार झाली अन् गेल्या दहा दिवसांपासून चर्चा, गप्पा अन् अफवांना पीक आले आहे, ते दखलपात्र आहे. जेथे जावे तेथे ‘जोर कोणा शे भाऊ, कोण निवडी येई?’ कोण निवडणार, कोण जाणार? कोण कोणाला धुळ चारणार? ही एकच चर्चा आहे.

माणसांमध्ये शेती, उद्योग, धंदा, महिलांमध्ये घर-संसार, मोलमजूरी, बालकांमध्ये शाळा अभ्यासाच्या गप्पा नाहीत, पण कोण येणार? या एकाच प्रश्नाभोवती मुले, माणसे अन् स्त्रियांमध्ये चर्चा रंग धरत आहेत.

शहर विकासाचे नागरी सुविधेचे ज्वलंत जिव्हाळ्याचे प्रश्न बाजूला ठेवून नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत कोण येणार? या एकाच प्रश्नाचे वेड लागले आहे.

निवडणूक प्रचारात तेच आरोप, तेच मुद्दे, जुन्याच प्रश्नांचे भांडवल करून विरोधी प्रचार करत आहेत. तर सत्तेतले गेल्या निवडणूकीतल्याच आश्वासवनांच्या प्रचार पुन्हा करत आहेत.

काँग्रेस व भाजपाने शक्तीप्रदर्शन करण्यासाठी शहरातून रॅली, प्रचारफेर्‍या काढल्या. असलेल्या गर्दीवरून जोर कोणाचा, असलेला कल कळत होता. यावेळी मात्र प्रत्येक पक्षाच्या रॅलीत असलेले कार्यकर्ते सशुल्क होते.

निवडणूकीच्या निमित्ताने शहरात सर्वांनाच चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. जेवण, चहा, नाश्ता व संध्याकाळी मजूरी रोख मिळत असल्याने शेतीकाम व इतर कामांना मजूर मिळेनासे झाले आहे. प्रचारकही एक दिवस या रॅलीत, दुसर्‍या दिवशी दुसर्‍या रॅलीत दिसतात.

‘यांचा-त्यांचा जय हो, खाने-पिने की सोय हो’ या उक्तीप्रमाणे ‘ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी’ ही म्हण बाजूला पडून ‘ज्याचे खावे मटण-त्याचेच दाबावे बटन’ असा वाक्प्रचार आता रुढ होत चालला आहे.

नितीमुल्याच्या, संस्काराच्या गप्पा मारणार्‍या नेत्यांना, उमेदवारांना यावेळी दारू मतदारांना कार्यकर्त्यांना दारू वाटावी लागत आहे. इतकी प्रतिष्ठा चपट्या बाटलीला प्राप्त झाली आहे.

कोण दारू वाटतो आहे, कोण पार्ट्या देत आहे, हॉटेल कोणत्या उमेदवाराने डायरी ठेवली आहे याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. एवढे करूनही मतदानाच्या दिवशी फुलीचा भाव शेकड्यात नाही तर हजारात राहील याचीही चर्चा होत असते.

निवडणूक ही लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी आहे. चांगला व्यक्ती समाजाचे पालिकेत प्रतिनिधीत्व करेल तर शहराचा विकास होईल, सोयी सवलती उपलब्ध होतील, शहर विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे जाईल याचे कुणालाही सोयरसुतक नाही.

माझा विजय, माझ्या पक्षाचा विजय, सत्ता माझ्याकडे यावी यासाठी सर्व हातखंडे वापरले जात आहेत. निवडणूक म्हटली की हे सर्व आलेच, ‘ये तो चलता है।’ या अशा प्रश्नांनी आपण कुठे होतो आणि कुठे जात आहोत याचे भान कुणाला नाही. पाच वर्षांच्या विकासाचा किंवा प्रगतीचा विचार करायला कुणालाही वेळ नाही. आज काय मिळेल या क्षणिक स्वसुखाचा विचार करून मतदान करेल आणि निवडून आल्यावर विकासाच्या नावाने किती निधी आणता येईल? त्यातून किती कमिशन निघेल याचा विचार नेते करताहेत!

शेवटी काय तर कोणा जोर शे… कोण निवडी येई… या चर्चेत जो साम-दाम तत्वाचा वापर करतोय त्याला विजयाची खात्री असेल, पण जागृत मतदार सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करेल असे गृहीत धरू या!

LEAVE A REPLY

*