शेतीला विज्ञानाची जोड आवश्यक – डॉ.विक्रांत भालेराव

0

नंदुरबार । शाश्वत उत्पादनासाठी शेतीला विज्ञानाची जोड आवश्यक आहे असे प्रतिपादन जागतिक मृदा दिवसा निमित्त झालेल्या कोळदा येथील कार्यक्रमात आ. उदेसिंग पाडवी यांनी केले.

दरवर्षी पाच डिसेंबर हा दिवस देशभरात जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग व आत्मा, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र, कोळदा येथेही जागतिक मृदा दिवस यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.

यामध्ये जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन तसेच रब्बी हंगामातील मुख्य पिकातील माती परिक्षणानुसार खताचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात आले.

दिवसेंदिवस जमिनीच्या समस्या वाढत.असुन त्याचे परिणाम पिकाच्या उत्पादनावर होत आहे. बदलत्या हवामानात जमिनीचे आरोग्य धोक्यात आहे. शेतीपासुन चांगले उत्पन्न घेण्यासाठी जमिनीचे आरोग्य टिकविणे गरजेचे आहे.

यासाठी जनजागरण करण्याच्या हेतुने हा जागतिक मृदा दिवस देशभर साजरा करण्यात येत असतो. यावेळी आ. उदेसिंग पाडवी उपस्थित होते. आ.पाडवी यांनी शेतक-यांना भरघोस, शाश्वत उत्पादनासाठी शेतीला विज्ञानाची जोड देण्याचे सूचित केले.

पारंपारिक शेती सोडून सुधारित, शास्त्रोक्त पद्धतीने शेती केली तर निश्चितच जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्‍यांची प्रगती होईल असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी विभागीय विस्तार केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मुरलीधर महाजन, कृषि महाविद्यालय, धुळे येथील मृद शास्त्रज्ञ डॉ. विक्रांत भालेराव, डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदासभाई पाटील, विश्वस्त ललित पाठक, कोषाध्यक्ष वासुदेव राव तसेच कृषि विभागाचे जिल्हा कृषि अधीक्षक रमेश शिंदे यांचीही उपस्थिती लाभली.

डॉ. विक्रांत भालेराव यांनी सेंद्रिय कर्बाचा उल्लेख करताना जमिनीच्या भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्माच्या दृष्टीने सेंद्रिय कर्बासाठी सेंद्रिय घटक हे शेणखत, गांडूळ खत व हिरवळीचे खत या सर्व माध्यमातून देणे आवश्यक असल्याचे सांगितले.

जमिनीच्या आरोग्यावरच मनुष्याचे आरोग्य अबलंबून असते. एखाद्या अन्नघटकांची कमतरता उद्भवते त्यावेळी या कमतरतेच मुख्य कारण त्या परिसरातील जमिनीत असलेल्या त्या अन्नद्रव्यांची कमतरता असल्याचे फलित असल्याचे डॉ. मुरलीधर महाजन यांनी सांगितले. आज शेती तसेच शेतकरी कठीण कालखंडातून जात आहे.

माती विषयीच्या जागरूकता कार्यक्रमातून एक चांगला संदेश जाईल. यासाठी शेतक-यांनी येवूनसामुहिकरित्या व परस्पर पूरक होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृष्णदास भाई पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात सांगितले.

मातीला आपली आई समजुन तिचे आरोग्य जोपासणे महत्वाचे असल्याचे सांगितले.कृषि अधीक्षक शिंदे यांनी जमिनीच्या आरोग्य संदर्भात कृषि विभागाद्वारे अमलात येणा-या योजनेचे विस्तृत कथन करून जिल्ह्यात एकूण 780 गावातील नमुन्यांची मृदा चाचणी करून शेतकर्‍यांना मृदा आरोग्यपत्रिका वितरीत करण्यात आल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी स्थानिक गरजेनुसार जमिनीचे योग्य व्यवस्थापन पद्धती अवलंबन करण्याची गरज असल्याचे सूचित केले. याप्रसंगी तळोदा येथील भिका चौधरी, सेंद्रिय घटक उत्पादक यांनीही आपले अनुभव कथन करताना निंबोळी पावडर व सेंद्रिय खताचे महत्व विषद केले.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री रेसकोर्स फंड अंतर्गत प्रकल्पातील शेतकरी, स्टेट बँक प्रशिक्षणार्थी तसेच कृषि विभाग,आत्मा, क्रोपसॅप स्काऊट,कडधान्य प्रकल्पातील शेतक-यांची उपस्थिती लाभली तसेच मान्यवरांच्या हस्ते मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले.

सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन पिक उत्पादन विषय विशेषज्ञ उमेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्व्तीतेसाठी जे. एन. उत्तरवार, पी.सी.कुंदे, आर. एम. पाटील, आर. आर. भावसार, व्ही. एस. बागल, गिता कदम, राहुल नवले, रजेसिंग राजपूत,किरण मराठे,कैलास सोनवणे,जितु माळी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*