ओखी वादळाचा निवडणुकीवर परिणाम प्रचारयंत्रणा ठप्प

0

महेश पाटील,नंदुरबार । नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत ‘ओखी’ वादळामुळे आलेल्या पावसामुळे प्रचारासाठी अडचण आली. त्यामुळे आज प्रचाराचा महत्वपूर्ण दिवस वाया गेला आहे.

मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ओखी वादळाच्या पार्श्वभुमिवर संभाव्य धोका लक्षात घेवून मुंबई, ठाणे आदी भागातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

नंदुरबार पालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना पावसामुळे अघोषित सुटी मिळाली आहे. नंदुरबार शहरात आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली होती.

त्यामुळे शहराचा पालिका निवडणुकीसाठी प्रचाराची रंगत सुरू असतांना आज पावसामुळे दिवसभर उमेदवारांना प्रचारासाठी बाहेर पडता आले नाही. त्यामुळे उमेदवारांसह त्यांचे समर्थकही पक्ष कार्यालयामध्ये बसलेले दिसत होते.

काही उमेदवारांनी पक्ष कार्यालयातूनच मिळालेल्या रिकाम्या वेळेत मतदार संघातील मतदारांना फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. रोज शहरातून उमेदवारांचे समर्थ मोटरसायकलीवर पक्षाचे झेंडे लावून शहरातून फिरतांना दिसून येत होते.

परंतु आज पक्षाचे झेंडे लावलेल्या मोटरसायकली आज पक्ष कार्यालयासमोर उभ्या असलेल्या दिसत होत्या. शहरात कुठेही रॅली दिसत नाही. तर फक्त काही ठिकाणी रिक्षांवर लावलेले ध्वनिक्षेपकावरून गल्लीतून प्रचार गीते वाजवतांना दिसत आहे.

शहरातील काही उमेदवारांनी मतदार संघातील मोठया संख्येच्या कुटूंबांकडे जाणे पसंत केले व ठराविक घरांमध्ये त्यांनी वेळ दिला. पालिकेच्या मतदानाला अवघे सात दिवस बाकी असतांना आज पाण्यामुळे प्रचारावर पाणी फिरले असून त्यामुळे चिंता वाढली आहे.

बर्‍याच उमेदवारांच्या समर्थकांनी पावसाचा आनंद घेत पाटर्या साजर्‍या केल्या तर काहींनी कार्यालयात गरमागरम नास्तावर ताव मारला.

निवडणुकीच्या कालावधीत कालपर्यंत शहराचे वातावरण प्रचारामुळे ढवळून निघाले होते. सर्व प्रचार गीते उमदेवारांच्या ढोल ताशांच्या आवाज शहरात घुुंमत होता.

आज अचानक पा़ऊस सुरू झाल्याने प्रचार रॅलींना आराम मिळाला. काही उमेदवारांनी आपल्या हक्काच्या मतदारांची दिवसभर कार्यालयात भेटी गाठी घेतल्या. उमेदवारांपैकी नवख्या व अतिउत्साही उमेदवारांनी रेनकोट घालून तर काहींनी छत्र्यांसह आपल्या मतदार संघात प्रचार केला.

आज शहरातील काही प्रभागांमध्ये कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु वातावरण पाहता व नागरीकांची उपस्थिती पाहता कॉर्नर सभेचे आयोजन पाहता सभेचे आयोजन पुढे ढकलण्यात आले आहे.

निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांनी यावेळेचा लाभ घेत आपल्या नेत्याच्या भेटी घेत आपल्या मतदार संघाचा लेखाजोखा मांडला.

असे असले तरी ओखा वादळामुळे पडलेल्या पावसाने आजच्या दिवशी उमेदवाराचा प्रचारावर पाणी फिरवले असून त्याचा फटका उमेदवारांना बसलेला दिसतो.

आज पाऊस पडत असतांना दुपारपर्यंत जोशात प्रचार करतांना फिरणार्‍या रिक्षा दुपारनंतर एखाद्या कोपर्‍यात लावून ध्वनिक्षेपकावरून प्रचाराचे गीत वाजत होते.

निवडणुकीसाठी सात दिवस असतांना आजचा वाया गेला आहे. कालपर्यंत उत्साहात असणार्‍या उमेदवारांची पावसामुळे उत्साहावर विरजण पडले. उत्तर महाराष्ट्रात हवामान खात्याने तीन दिवस अंदाज व्यक्त केला आहे. अजून दोन दिवस पाऊस पडला तर प्रचाराचे काय होईल. अशा विचाराने उमेदवार त्रस्त आहे.

LEAVE A REPLY

*