गुलाबी थंडीतही वाहताय निवडणुकीचे गरम वारे

0

चेतन इंगळे,मोदलपाडा । तळोदा शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. गुलाबी थंडीमध्येदेखील निवडणुकीचे गरम वारे वाहू लागल्याने शहरात रात्री उशिरापर्यंत सर्वच राजकीय पक्षांची प्रचाराची रेलचेल ही सुरू आहे.

तळोदा पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच राजकीय पक्ष्यांनी आपल्या प्रचाराचे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करून विविध प्रभागात प्रचार कार्यालये उभारली आहेत.

या निवडणूक प्रचारात युवा वर्ग सर्वात जास्त उत्साही दिसून येत आहे. त्यातल्या त्यात बालगोपाल मंडळीही सहभाग घेतांना दिसून येत आहे. रात्री उशिरापर्यंत उमेदवार प्रत्येकाच्या घरी जाऊन मलाच मतदान करा अशी विनंती करत आहे.

निवडणुकीची धामधूम सोबत लगीनघाई देखील जोरात सुरू असून उमेदवार एक ही लग्न सोडत नसून हजेरी लावतांना दिसत आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भर दिला आहे.

मागील काळात केलेली कामे आणि भविष्यात करणार्‍या कामाबाबत मतदारांना आपली भूमिका समजावून सांगून मतदारांना आकर्षित करण्याचे सर्वच प्रकारचे प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केले आहे.

भाजपाने प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे तर आ. उदेसिंग पाडवी हे दररोज प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन कॉर्नर सभा घेत आहे. शहराची ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्यांवर गाजणार आहे, असेदेखील आ.उदेसिंग पाडवी यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. त्यामुळे काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांतर्फे एकमेकांवर जाहीर सभेत या विषयांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत.

प्रत्येक उमेदवार हा बाहेरगावी असलेल्या मतदारांचा शोध घेऊन संपर्कात आहे, पण मतदार प्रत्येकाला हो म्हणून सर्वांची मने जिंकत आहे. साम, दाम, दंड, भेद याचा उपयोग व अन्य मार्गाने निवडणूक फंडा वापरून व राजकीय डावपेच याचाही वापर जो तो आपल्या पद्धतीने करत आहे.

तळोदा शहरात सर्वच राजकीय पक्षांनी बॅनर, झेंडे, पताके लावून संपूर्ण शहर निवडणूकमय झालेले दिसून येत आहे. काही प्रभागात मोठे बॅनर लावणे सुरू झाले.

पण प्रभाग क्र. 8 मध्ये अपक्ष उमेदवार भरत चौधरी यांना चिन्ह वाटप न झाल्यामुळे त्यांना प्रचारच करता येत नाही आहे. यामुळे त्यांचे निवडणुकीमध्ये नुकसान होऊ शकते.

पण शेवटी मतदारांना आपल्याकडे वळविण्यात कोणता पक्ष यशस्वी होतो, हे येणार्‍या 14 डिसेंबर रोजी मतमोजणीनंतरच चित्र समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

*