दोन दिवसात 10 लाखांची रोकड हस्तगत

0

नंदुरबार । येथील नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहिता पथकाने दोन दिवसात सुमारे दहा लाख रुपयांची रोकड जप्त केली. याबाबत योग्य ती चौकशी करुन कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नंदुरबार येथे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात होणार्‍या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी आचारसंहितेचे भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे.

या भरारी पथकाने दोन दिवसात दहा लाखाची रोकड हस्तगत केली आहे. मात्र, सदर रक्कम कोणाकडून हस्तगत करण्यात आली, त्यावर पुढे काय कार्यवाही करण्यात आली याबाबत अद्याप प्रशासनाकडून खुलासा करण्यात आलेला नाही. या संदर्भाची चौकशी सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले.

निवडणुकीच्या काळात मतदरांना प्रलोभन देण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्यात येतो. अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी आदर्श आचारसंहिता पालिका हद्दीत लागू करण्यात आली आहे.

असे असतांनाही लपून छपून गैरमार्गाचा अवलंब करण्याची शक्यता असल्याने यावर लक्ष ठेवण्यासाठी आचारसंहितेचे भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे.

सदर पथक वाहनांची तपास करीत अन्य भागामध्ये फिरून गैरप्रकारांवर लक्ष ठेवत आहे. काल दि.1 डिसेंबर रोजी दुपारी 11 ते 12 दरम्यान नंदुरबार शहरातील धानोरा रस्त्या दरम्यान एका वाहनाची भरारी पथकाने तपासणी केली. या तपासणी दरम्यान एका इसमाकडे दीड लाख रूपयाची रोकड आढळून आली.

तसेच आज दि. 2 डिसेंबर रोजी नंदुरबार- निझर रस्त्यावर एका इसमाकडून आठ ते साडेआठ लाख रूपयांची रोकड आढळून आली.

पथकाने सदर रक्कम ताब्यात घेतली असून चौकशीसाठी निवडणुक निर्णय अधिकार्‍यांकडे जमा केली आहे. सदर रक्कम कशासाठी बाळगण्यात आली, यासंदर्भात चौकशी करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

*