ग्रामीण भागात सोयी सुविधा वेळेत पोहचवाः अग्रवाल

0

नंदुरबार । जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासकीय यंत्रणांनी मुलभूत सुविधांची कामे कालमर्यादेत पूर्ण करीत नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाचे सहसचिव राजेश अग्रवाल यांनी आज येथे दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांच्या विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा, तळोदा प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विनय गौड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे, याच्यासह विविध विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते.

सचिव श्री. अग्रवाल पुढे बोलतांना म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यात विद्युतीकरण करुन प्रत्येक शाळा, वसतीगृह, आश्रमशाळेत अखंडीत विद्युत पुरवठा करावा तसेच शेतीसाठी प्रत्येक गांवात 24 तास वीज मिळले असे नियोजन करावे.

आरोग्य सुविधेसाठी दुर्गम भागात पुरेसे डॉक्टर, आशावर्कर असणे आवश्यक असून जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण करावे. रुग्णास 108 रुग्णवाहिकेची सेवा चांगली व तात्काळ उपलब्ध व्हावी.

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातच रुग्णास सर्व सुविधा मिळण्यासाठी आरोग्य केंद्रातील साधन सामुग्री अद्ययावत व सुस्थितीत ठेवाव्यात ज्यामुळे रुग्णास उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची आवश्यता भासणार नाही.

भारत संचार निगम लि. कंपनीची दूरध्वनी सेवा अधिक गतीमान व नेहमी सुरळीत सुरु राहील अशी असावी. इन्टरनेट कनेक्टीव्हीटीच्या साधन सामुग्रीसाठी पुरेसे अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल त्यामुळे पुर्ण जिल्ह्यात इन्टरनेट कव्हरेज चांगले राहील अशी सेवा द्यावी.

सिंचन विभागाने उपलब्ध पाण्याचे परिपूर्ण नियोजन करुन ते सिंचनासाठी कसे उपलब्ध होवू शकेल याचेही नियोजन करावे जेणेकरुन शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

जिल्ह्यात धान्य वितरण, पोषण आहार, विद्यार्थ्यांना गणवेश, शिष्यवृत्ती, लसीकरण, आरोग्य सेवा या गोष्टी वेळेवर व नियमित मिळते किंवा नाही याबाबत संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांनी वेळोवळी प्रत्यक्ष भेटी देवून आढावा घ्यावा अशा सूचनाही यावेळी सचिव श्री. अग्रवाल यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

यावेळी आरोग्य, शिक्षण, कृषि, विद्यूत, रस्ते, बीएसएनएल, सिंचन, बँक, धान्य वितरण आदि विभागातील कामांचा आढावा सचिव श्री.अग्रवाल यांनी घेतला.

LEAVE A REPLY

*