सारंगखेडा यात्रोत्सवास आजपासून सुरूवात

0

रघुनाथ बेलदार – शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील नाविन्यपूर्ण मनोरंजनात्मक, स्पर्धात्मक अशा जगप्रसिध्द असलेल्या श्री एकमुखी दत्तप्रभुंच्या यात्रेस उद्या दि.3 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे.

दत्तप्रभुंच्या जयंती दिनी पहाटे शुध्द जलाने प्रभुंचे स्नान करून विविधत पूजन केले जाते. त्याचदिवशी रात्री 8 वाजता सवाद्य पालखीची मिरवणूक काढण्यात येते. एकमुखी दत्त मंदिराची स्थापना सुमारे सन 1845 ला झाली आहे.

सदर मंदिर 153 वर्षापुर्वीचे असून ते जमिनीपासून 50 फुट उंच टेकडीवर आहे. 70 फुट उंचीचे नक्षीदार व आकर्षक असे हे मंदिर आहे. मंदिराच्या गाभार्‍यात श्री दत्तप्रभुंची मुर्ती आहे. हे देवस्थान एक जागृत देवस्थान आहे.

महानुभवांचे हे प्रभु चरणस्पर्शी स्थान आहे. महानुभावांच्या तत्वावनुसार श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्री दत्तात्रय महाराज, श्री चक्रपाणी महाराज, गोविंद प्रभु महाराज व चक्रधर स्वामी महाराज अवतार हे पंचकृष्ण आहेत. युगायुगात अवतारण धारण करण्यासाठी हे अवतार आहेत.

श्री दत्तप्रभुंच्या चरणी नतमस्तक होवून आपण काही नवस मानला तर तो पूर्ण होतो. म्हणून नवस पूर्ण झाल्यावर म्हणजेच मनोकामना पूर्ण झाल्यावर नारळ, गुळ, केळी, साखर आदीची तुला उतरवण्याची प्रथा पूर्णापार आहे. लाल कपडयात नारळ बांधून तो नवस बोलून ते नारळ मंदिरात बांधून ठेवण्याची प्रथा आहे.

तसेच सारंग वाद्यावरून सारंगखेडा नाव प्रचलित आहे. 1990 साली मंदिराच्या कळसास नवीन सुवर्ण गिलीट चढविण्यात आला आहे.

भारतात राजस्थानातील पुष्पर येथे सर्वात मोठा पशु मेळावा भरतो. त्यानंतर सारंगखेडा येथे मोठा घोडेबाजार भरला जातो. ही यात्रा खास करून घोडे बाजारासाठी प्रसिध्द आहे.

घोडे बाजारात विविध राज्यातील घोडे विक्रीसाठी दाखल होतात. येथील बाजारात घोडे खरीददार व घोडे विक्रीदार तसेच घोडे बाजार बघणार्‍यांची संख्या दरवर्षी वाढतच राहते.

यावर्षी 3 डिसेंबर 2017 ते 2 जानेवारी 2019 पर्यंत चेतक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. चेतक फेस्टीवल आयोजन पुरूष व महिला समिती, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ व प्रसाद सेवाभावी व ग्रामीण विकास संस्था सारंगखेडा याद्वारे यात्रेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

कबड्डी स्पर्धा, अश्वशर्यत स्पर्धा, अश्वनृत्य स्पर्धा, शरीर सौष्ठव स्पर्धा तसेच महिलांसाठी मिस अ‍ॅण्ड मिसेस सारंगी स्पर्धा, सारंगी स्पर्धा, राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा व सांस्कृतीक कार्यक्रम स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी लालू अ‍ॅण्ड सन्स या संस्थेमार्फत चेतक फेस्टीवलचे आयोजन करण्यात येणार आहे. पुष्करची प्रतिरूप आखणी करण्यात येणार असल्याने घोडे बाजाराचे एक नाविन्यरूप यावर्षी पर्यटकांना बघण्यास मिळणार आहे.

त्यामुळे यावर्षी पर्यटकांची संख्या वाढणार आहे. पर्यटकांसाठी राहण्यासाठी पंचतारांकीत हॉटेल्स उपलब्ध होणार आहेत. शिवाय बोटींगचा सुध्दा आनंद घेता येणार आहे.

दरवर्षी घोडे बाजारात करोडोंची उलाढाल होते. नाविन्यपूर्ण घोडे दाखल होतात. त्यामुळे मागीलवर्षी या गावाला अश्वसंग्रालय उभारले जाणार अशी घोषणा करण्यात आली होती. त्याची दखल घेवून राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावर्षी अश्वसंग्रहालयाचे 5 कोटीच्या वास्तुचे भुमिपूजन होणार आहे.

गुजरातमधील रण महोत्सव, राजस्थानातील पुष्कर महोत्सव यांच्या धर्तीवर सारंगखेडा येथील महोत्सव, रंगदार ठरणार आहे. पर्यटकांसाठी बैलगाडी समर, सायकलसमर, हॉर्स रायडींग कॉमेडी शो व नाविन्यपूर्ण सांस्कृतीक कार्यक्रम यांची मेजवाणी मिळणार आहे.

यात्रेत संसारोपयोगी वस्तु, खेळणी, मसालेयुक्त पदार्थ, फराळाचे नाविन्य युक्त पदार्थ याशिवाय मनोरंजनाची विविध साधने, झुले, महिलांसाठी सौंदर्य प्रसाधनांची दुकाने थाटण्यात येतात.

शेतकर्‍यांसाठी शेतीयुक्त लोखंडी व लाकडी बैलगाडी, प्रेरणीचे यंत्र, सौरयंत्र याशिवाय शेतकर्‍यांना वापरण्यास सोयीचे असे शेती यंत्रे विक्रीसाठी यात्रेत उपलब्ध होतात.

घर बांधण्यासाठी उपयुक्त सागवान व सुबाभूळ लाकुड, खैर लाकुड तसेच शेतीसाठी लाकडी अवजारे व फर्निचर तसेच लोखंडी संसारोपयोगी वस्तु विक्रीसाठी येतात. बचत गटाचे स्टॉल लावण्यात येतात.

सारंगखेडा येथील एकमुखी दत्त प्रभुच्या जयंती निमित्ताने भरणार्‍या यात्रेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. टिव्ही कॅमेरे लावून पोलीस चौकी उभारून यात्रेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येते. यात्रेदरम्यान यात्रेतून अवजड वाहनांची येजा होवू नये, म्हणून जोड वाहनांना बंदी घातली जाते.

त्यांची वाहतुक नंदुरबार व शिरपूरमार्गे वळविली जाते. त्यामुळे अपघात टाळता येतात. यात्रा ही मनोरंजनासाठी व ज्ञानवृध्दीसाठी तसेच खरेदी विक्रीसाठी भरविली जाते. तिचे पवित्र्य टिकावे म्हणून राजकीय बॅनर, शुभेच्छा व अभिनंदन बॅनर लावण्यास मज्जाव केला जातो.

यात्रा आधुनिक करण्यासाठी जि.प. सदस्य व यात्रा समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल व त्यांचे सहकारी नेहमी झटत असतात. यात्रेत यात्रेकरूंसाठी शुध्द जलपेयाची सोय करण्यात येते.

यात्रेत येणार्‍या सर्व यात्रेकरूंचे आरोग्य चांगले रहावे. यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत व आरोग्य सेवेचे स्टॉल लावण्यात येतात. स्वच्छतेसाठी स्वतंत्र स्वच्छतादूतांची नेमणूक केली जाते.

यात्रेत मौतका कुवा, सर्कस, विविध तमाशा मंडळे, फिरते सिनेमागृह सुध्दा दाखल होतात. यात्रेची माहिती सर्वांना घर बसल्या मिळण्यासाठी यात्रेची वेब साईट सुरू करण्यात आली आहे.

यात्रेकरूंची व्यापारी वर्गाची व जनतेची आर्थिक व्यवहार करण्यासाठी गैरसोय होवू नये, म्हणून येथील बँकांना तत्पर सेवा देण्याचे व बँकात पैशांचा पुरवठा अधिक ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

यात्रेचे आयोजन नियोजन व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ए.बी. पाटील, विविध खात्याचे पदाधिकारी, शहादा तहसिलदार मनोज खैरनार, शहादा गटविकास अधिकारी एस.आर. कांगणे, दिगंबर बेलदार, भरत निकुंभ, मंदिराचे विश्वस्त चेतक महोत्सव समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ.परदेशी, ग्रामसेवक आर.आर. बोरसे, भरत गिरासे व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

*