नगराध्यक्षपदासाठी चार राष्ट्रीय पक्ष रिंगणात : नगरसेवकपदासाठी भाजपातर्फे 39 तर काँग्रेसतर्फे 34 उमेदवार

0

महेश पाटील,नंदुरबार । नगरपालिका निवडणुकीसाठी नंदुरबार येथे चार राष्ट्रीय पक्ष, एक प्रादेशिक पक्ष आणि एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. उमेदवारांच्या या भाऊगर्दीमुळे प्रमुख दोघा उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

पालिका निवडणुकीसाठी लढणार्‍या अंतीम याद्या प्रसिद्ध झाल्या असून नंदुरबार पालिकेसाठी नगराध्यक्षपदासाठी चार राष्ट्रीय पक्षांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.

यात काँग्रेसतर्फे सौरत्ना चंद्रकांत रघुवंशी, भाजपातर्फे डॉ.रविंद्र हिरालाल चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आरीफ कमर शेख, एम.आय.एम.तर्फे सैय्यद रफअत हुसैन सदाकत हुसैन हे राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार असून राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पुष्पा प्रविण थोरात, अपक्ष म्हणून प्रकाश बारकू भोई हेदेखील रिंगणात आहेत.

नगरसेवक पदासाठी रस्सीखेच

पालिका निवडणुकीसाठी नंदुरबार शहरात 19 प्रभागातून 39 जागांसाठी निवडणुक होत आहे. यात नगरसेवकपदासाठी सहा प्रमुख पक्षांनी आपआपले उमेदवार रिंगणात उतरविले आहे.

यात भाजपाच्या 39, काँग्रेस 34, राष्ट्रवादी 7, एम.आय.एम.7, शिवसेना 5, राष्ट्रीय समाज पक्ष 4 तर अपक्ष 17 अशा एकूण 122 उमेदवारांचा समावेश आहे.

या पक्षांमधील उमेदवारी पाहता काही वार्ड सोडले तर दुहेरी, तिहेरी लढत होणार आहे. पालिका निवडणुकीत 39 जागांपैकी 17 जागांसाठी दुहेरी, 15 जागांसाठी तिरंगी, पाच जागांसाठी चौरंगी लढत होणार आहे.

प्रभाग क्र. 12 ब साठी 7, प्रभाग 13 ब साठी सहा उमेदवार रिंगणात आहे. उमेदवारांची वाढती संख्या पाहता प्रमुख पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे. नंदुरबार नगरपालिकेत प्रमुख लढत काँग्रेस व भाजपामध्ये होणार असली तरी इतर पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवार कोणाची मते मिळवतात हे महत्वाचे ठरणार आहे. नंदुरबार पालिकेसाठी काँग्रेस व शिवसेनेची युती असल्याने काँग्रेसने 34 तर शिवसेनेने 5 जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपाने संपूर्ण 39 जागांसाठी आपले उमेदवार दिले आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 37 उमेदवार रिंगणात उतरवणार्‍या राष्ट्रवादीने यावर्षी अवघ्या सात उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.

प्रमुख पक्षाच्या लढतीमध्ये 17 अपक्ष उमेदवारांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार आहे. पालिकेच्या निवडणुकीतील 112 उमेदवार रिंगणात असले तरी 17 अपक्ष उमेदवार व एमआयएमचे सहा उमेदवार यांची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर पडते हे दि.14 डिसेंबर रोजी कळणार आहे.

एमआयएम पक्षाने जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेत 4 नगरसेवक निवडुन आणण्याची किमया केली होती. त्यामुळे नंदुरबार पालिकेत एमआयएम काय करिष्मा करतो ते बघणे महत्वाचे ठरणार आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत 37 नगरसेवकांपैकी 36 नगरसेवक हे काँग्रेस पक्षाने जिंकले होते. पालिकेच्या निवडणुकीत 39 जागांसाठी 112 उमेदवारांची उमेदवारी असली तरी सहा प्रमुख पक्षांच्या उमेदवारीमुळे नंदुरबारच्या पालिकेच्या निकाल काय लागतो याची नागरीकांमध्ये उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

*