वडाळी येथील पशुवैद्यकीय दवाखाना वार्‍यावर

0
बामखेडा ता.शहादा  / शहादा तालुक्यातील वडाळी येथील पशुवैद्यकीय दवाखाना वार्‍यावर असून पशुमालकांना यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
वडाळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारीच उपलब्ध राहत नसल्याने गांवकर्‍यांत नाराजी आहे. वडाळी पशुवैद्यकीय दवाखाना हा श्रेणी 1 चा दवाखाना असून वडाळीसह खैरवे , भडगांव, देऊर, बोराळा, मातकूट, कोंढावळ, खापरखेडा, काकर्दा आदी गावांचा समावेश होतो. मात्र, याठिकाणी सदर अधिकारी अथवा कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने व राहिलाच तर पुरेश्या प्रमाणात औषधी उपलब्ध नसल्याने पशु मालकांना बाहेरून औषधी मागवण्याचा सल्ला दिला जातो.
काहीवेळा वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने पशु दगावण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. म्हणून पर्यायाने खाजगी पशु वैद्याकडे आपली जनावरे घेवून जावी लागतात.
तो अवाच्या सव्वा पैसे उकळतो. ज्याठिकाणी 20 ते 30 रुपये लागतात त्याच ठिकाणी 100 ते 200 रुपये लागत असल्यामुळे पशुधन मालकांत नाराजी निर्माण झाली आहे.

हे अधिकारी याठिकाणी मुख्यालय असुनदेखील थांबत नाहीत. ते त्याठिकाणी थांबले तर अश्या समस्याच निर्माण होणार नाहीत.

या दवाखान्यात कुठल्याही प्रकारची नोंद आढळत नाही. तसेच दर फलकही लावण्यात आला नाही. दवाखान्याच्या प्रवेशद्वारावर पशुवैद्यकीय दवाखाना असल्याचा फलकदेखील नाही.

दवाखान्यात आतमध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. त्याठिकाणी काटेरी झाडे-झुडपे देखील उगवलेली आहेत. तिथे कुठलीही स्वच्छता आढळत नाही.

या पशुवैद्यकीय अधिकार्‍याची मुजोरी कोणाच्या आशीर्वादाने चालली आहे.असा प्रश्न गावकर्‍यांना पडत आहे. या अधिकार्‍यांवर त्वरित कार्यवाही व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

*