तळोद्यातील सर्व हरकती फेटाळल्या नगराध्यक्षपदाचे तीन तर नगरसेवकपदाचे आठ अर्ज अवैध

0

तळोदा । श.प्र.-तळोदा नगर पालिकेच्या निवडणूकीसाठी दाखल करण्यात आलेल्या सर्व अर्जांची आज छाननी करण्यात आली. यावेळी अनेक उमेदवारांच्या अर्जांवर हरकती घेण्यात आल्यात.

दोघा पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करीत सर्व हरकती फेटाळल्यात आल्यात.

नगराध्यक्ष पदाच्या एकुण 7 अर्जांपैकी 3 अर्ज अवैध तर नगरसेवकपदाच्या 64 अर्जांपैंकी 8 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.

तळोदा नगर पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 7 अर्ज तर नगरसेवक पदांसाठी 64 अर्ज असे एकूण 71 अर्ज दाखल करण्यात आले होते.

आज या दाखल करण्यात आलेल्या अर्जांवर मध्यवर्ती तहसील कार्यालयात हरकती घेण्यात आल्यात. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार योगेश चंद्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार आदी उपस्थित होते.

यावेळी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत बबनराव माळी, जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी व रोहित भरत माळी यांच्या अर्जावर भाजपा नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय छबुलाल परदेशी यांनी हरकत घेतली.

तसेच काँग्रेसचे प्रभाग क्र. 1 ब मधील नगरसेवक पदांचे उमेदवार योजना भरत माळी यांच्या अर्जावर भाग्यश्री योगेश चौधरी यांनी हरकत घेतली.

प्रभाग क्र. 9 ब मधील संजय बबनराव माळी यांच्या अर्जावर किरण अशोक सुर्यवंशी यांनी हरकत घेतली. प्रभाग क्र. 5 ब मधील अपर्णा अनिल माळी यांच्या अर्जावर अंबिका राहुल शेंडे यांनी हरकत घेतली.

यावेळी काँग्रेसच्या वतीने अ‍ॅड. सचिन राणे यांनी तर भाजपाच्या वतीने अ‍ॅड. डी.एम.रावळ यांनी युक्तिवाद केला. दोघा वकिलांचा युक्तिवाद जवळपास 1 तास चालला.

त्यानंतर 2 तासानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपला निकाल देत काँग्रेसच्या उमेदवारांवर घेण्यात आलेले सर्व आक्षेप फेटाळण्यात येवून त्यांचे अर्ज मंजूर केलेत.

मात्र त्यांपैकी काँग्रेसचे रोहित भरत माळी यांनी भरत बबनराव माळी यांचे पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता.

भरत माळी यांचा अर्ज मंजूर झाल्याने रोहित माळी यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. आज नगराध्यक्ष पदांसाठी 3 तर नगरसेवक पदांसाठी 8 अर्ज नामंजूर करण्यात आलेत.

त्यामुळे आता नगराध्यक्ष पदांसाठी एकूण 4 उमेदवार तर नगरसेवक पदांसाठी 56 उमेदवार आता रिंगणात आहेत, मात्र अंतिम चित्र माघारी नंतरच स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

*