नवापुरात भाजपातर्फे ज्योती जायस्वाल

0

नवापूर । प्रतिनिधी-येथील नगर पालिका निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठी 10 पैकी 4 अर्ज बाद झाले असून आता रिंगणात 6 उमेदवार आहेत. नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी दाखल 148 नामांकन पैकी 35 बाद झाले असून रिंगणात 113 आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी दहा तर दहा प्रभागांतून नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी 148 नामांकन अर्ज प्राप्त झाले होते. आज छाननी अंती नगराध्यक्ष पदाचे चार व नगरसेवक पदाचे पस्तीस नामांकन अवैध ठरले आहेत.

निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष पदाचे सहा व नगरसेवक पदाचे 113 उमेदवार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून ज्योती दिपचंद जयस्वाल, काँग्रेसकडून हेमलता अजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. अर्चना नरेंद्र नगराळे, शहर विकास आघाडीच्या सोनल धर्मेंद्र पाटील, बहुजन समाज पार्टीच्या संगीता गजानन सावरे, आणी समाजवादी पक्षाच्या शेख अज्मीना जावेद निवडणूक रिंगणात आहेत.

काँग्रेस पक्षातर्फे दिपिका हेमंत पाटील व सुरैय्याबी फारूख शाह यांनीही नामांकन दाखल केले होते. मात्र पक्षाचे तिकिट न मिळाल्याने त्यांचे अर्ज बाद झाले.

भारतीय जनता पार्टीतर्फे जुन्या कार्यकर्त्या तथा माजी उपनगराध्यक्षा शैलाताई भिकाजी टिभे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. तथापि ऐनवेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांचे नाव वगळून काँग्रेसच्या माजी उपनगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका ज्योती जयस्वाल यांना अधिकृत उमेदवारी दिली.

त्यामुळे शैलाताई टिभे यांचा नामांकन अर्ज बाद झाला. दरम्यान आता 30 नोव्हेंबर पावेतो उमेदवार माघारीची मुदत असून किती उमेदवार रिंगणात कायम राहतात ते निश्चित होणार आहे.

बहुतांश इच्छुकांना नामांकन दाखल करायला लावून ऐनवेळी मर्जीतील व्यक्तींना पक्षाच्या अधिकृत उमेदवारीचे पत्र देण्यात आल्याने काँग्रेस व भाजपा या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये नाराजी वाढली आहे.

मोठया प्रमाणावर पक्षांतर्गत बंडाळी माजणार असून विरोध शमविण्यासाठी नेते मंडळींना पराकाष्ठा करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

*