ऊसतोड अर्धवट सोडून मजुरांचे पलायन

0

शहादा । दि.20 । ता.प्र.-शहादा तालुक्यातील म्हसावद व बुडीगव्हाण येथील शेतकर्‍यांची ऊसतोडणी अर्धवट सोडून संबंधीत कारखान्याच्या तोडणी मजूरांनी काढता पाय घेतला.

याबाबत फसगत झालेल्या शेतकर्‍यांनी सातपुडा कारखान्याकडे आपला ऊस घेण्याबाबत साकडे घातले आहे. या सर्व प्रकारामुळे बाहेरील कारखान्याने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

शहादा तालुक्यातील म्हसावद येथील राजाराम पाटील यांच्या शेतात तसेच बुडीगव्हाण येथील मराठे कुटुंबियांचे एकूण 10 एकर ऊसाचे क्षेत्रफळ आहे. त्यांनी को.0265 ऊसाची लागवड केलेली असून, त्यांनी स्थानिक कारखान्यांकडे त्याची नोंद केलेली नव्हती.

द्वारकाधिश साखर कारखाना प्रा.लि. या कारखान्यास त्यांनी ऊस देऊ केले. पहिले 4 दिवस ऊस तोड करून जवळपास 3 एकर ऊस कारखान्याने तोडला आणि तोडलेला ऊस तेथेच पडू दिला.

उर्वरित 7 एकर ऊसाचे क्षेत्र न तोडता ऊस तोड कामगार काढून घेतले व तोड बंद करण्यात आली. त्यामुळे सदर मराठे कुटुंबियांनी सातपुडा साखर कारखान्यात उर्वरित ऊस गाळपास घेणार का, अशी विचारपूस केल्याने त्या शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याची अधिकृत माहिती प्राप्त झालेली आहे.

त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी बाहेरील कुठल्याही कारखान्यास ऊस देऊ नका, जादा भावाचे आमीषाने आपली फसवणूक होईल याची दक्षता घ्यावी, स्थानिक कारखान्यांनाच ऊस पुरवठा करावा असे आवाहन सातपुडा कारखान्याकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, बाहेरील जिल्हयातील साखर कारखान्यांकडून अनेकवेळा आमिष दाखवून ऊस पळविण्याचा प्रकार वारंवार समोर येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक होते. यासाठी ऊस उत्पादकांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*