राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

0

प्रदीप दीक्षित,शिंदखेडा । दि.16-शिंदखेडा नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रक्रीयेला वेग आला असून राजकीय पक्षांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

इच्छूकांनी फिल्डींग लावण्याचे काम सुरू केले असून कोठे कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार राहील, याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. सध्या प्रत्येक पक्षाने आपल्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रमाचे नियोजन सुरू केले आहे.

नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांसाठी 17 प्रभागांची निर्मिती करण्यात आली आहे. नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव असून प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून येणार आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे बहुमताच्या जोरावर होणारा घोडेबाजार निश्चितच बंद होणार आहे. 2017 ते 2022 या पंचवार्षिक कालावधीसाठी ही निवडणूक होत आहे.

मध्यंतरीच्या काळात अनिल वानखेडे व प्रा.सुरेश देसले हे दोनही गट आपल्या नगरसेवकांसह विकासाचा संकल्प घेवून एकत्रितपणे शहर विकास साधण्यासाठी सज्ज झाले होते. म्हणजे नगरपंचायतीत सर्वच सत्तेत, कोणीही विरोधक नाही असे वातावरण निर्माण झाले होते.

या परिस्थितीमुळे 2017 मध्ये येणारी निवडणूक बिनविरोध होते की काय अशी चर्चा होत होती. त्यात रावसाहेब व भाऊसाहेब हे दोनच गट शिंदखेडा शहराच्या राजकारणात वारसदार असल्याची चर्चा रंगू लागली होती.

तर एकेकाळी राजकीय खेळीत अग्रेसर मानले जाणारे समाजवादी विचारसरणीचे विजयसिंह राजपूत वेगवेगळ्या कारणामुळे राजकीय प्रवाहाच्या बाहेर होते.

आपणांस राजकारणात काही एक रस नाही असेही ते म्हणू लागले होते. त्यांनी अलिप्तता घोषीत केली होती. असे असले तरी त्यांनी राजकारणात पुनश्च: आपले अस्तित्व अजमावण्याचा संकल्प केला आहे.

ते स्वत: निवडणूक रिंगणात असणार आहेत. त्यांच्या या संकल्पामुळे नगरपंचायत निवडणुकीत निश्चितच नवीन समिकरणे निर्माण झाली असून आघाडी स्थापण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच जागा वाटप धोरणांवर चांगलीच चर्चा होूवू लागली आहे.

प्रा. सुरेश देसले गट काँग्रेससोबत राहण्याच्या विचारात असतांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्याशी असलेल्या विरोधामुळे प्रा.देसले गट काही राजकीय समीकरणामुळे अडचणीत आला होता.

मात्र आज काँग्रेससोबत प्रा.देसले गट यांचे नाते पुनश्च प्रभावीत झाले आहे. सोबत राष्ट्रवादी व सोबत विजयसिंह राजपूत हेही जोडले जाण्याची चर्चा होवू लागली आहे.

जागा वाटप धोरण अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र ‘त्रिकुट’ बरोबर राहण्याच्या निर्णयाप्रत येईल, असे वातावरण आहे.शिवसेनेने मात्र स्वतंत्र चुल मांडण्याचे जाहीर केले आहे.

खा. संजय राऊत यांच्याहस्ते शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले असून स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर झाले आहे.

तर भाजपा प्रचार कार्यालयाचा शुभारंभ भाजपाचे मंत्री ना. जयकुमार रावल यांच्याहस्ते झाले. काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचेही लवकरच उदघाटन होईल. दरम्यान प्रशासनाने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांची नियुक्ती झाली आहे.

निवडणुकीत काँग्रेस आघाडी-शिवसेना यांनी चांगलीच कंबर कसली असून मंत्री ना.जयकुमार रावलप्रणीत भाजपा व अनिल वानखेडे गटाला रोखण्यासाठी विरोधक एकत्र येतील, हे मात्र निश्चित आहे.

तर आपल्या विजयासाठी भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी आणि मंत्र्यांनी चंग बांधला आहे. त्यासाठी भाजपाला तोडीस तोड उमेदवार उभे करावे लागणार आहेत.

LEAVE A REPLY

*