16 खत कंपन्यांचे नमुने अप्रमाणित

0

शहादा । दि.16 । ता.प्र.-पंचायत समितीचे कृषी विभागाने शहादा तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करून खत व कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत दिले होते.

यातील 16 खत आणि दोन किटकनाशक कंपनी यांचे नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल मिळाल्याने खत नियंत्रण आदेश तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम याप्रमाणे शहादा पंचायत समिती कृषी अधिकारी तथा बियाणे गुणवत्ता नियंत्रण ए.जी. कागणे यांनी कारवाई करीत शहादा न्यायालयात दावा दाखल केला आहे.

त्यात एव्हरग्रीन मायक्रोन्युटिएंट पुणे, सन अँड ओसिन इंडस्ट्रिज पुणे, डेबॉन अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, कर्नाटका अ‍ॅग्रो केमिकल बँगलोर, अ‍ॅपेक्स अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज भरूच, भाग्योदय इंडस्ट्रीज वाघोदा, निर्माण फर्टिलायझर प्रा.लि. अनुमान अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज पुणे, जी.बी.अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, एन.के. फर्टिलायझर यांचे दुय्यम खतांचे नमुने अप्रमाणित तर कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड सिकंदराबाद, भारत अ‍ॅग्री फर्टिलायझर पालघर यांचे सिंगल सुपर फास्फेटचे नमुने अप्रमाणित आले होते.

इंडियन पोटॅश लिमीटेड, हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड भरूच, कृभको, जुआरी अ‍ॅग्रो केमिकल गोवा यांचे संयुक्त खतांचे नमुने अप्रमाणित आल्याने त्यांच्याविरोधात शहादा येथील मा.न्यायालयात खत (नियंत्रण) आदेश 1985 च्या कलम 13(2) व 19(ब) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या नियम 3 व 7 अंतर्गत दावे दाखल करण्यात आले आहेत.

हेरंबा इंडिया लिमिटेड मुंबई या कंपनीचे इमिडॅक्लोप्रीड व अनु प्रोडक्ट लिमीटेड फरीदाबाद कीटकनाशक कंपन्यांचे नमुनेही संशयास्पद आढळल्याने दावा दाखल आहे.

2015-16 या वर्षात कृषी अधिकारी तथा बियाणे गुणवत्ता नियंत्रक ए.जी.कागणे यांनी शहादा तालुक्यात 9 ठिकाणी तपासणी करत कारवाई केली होती. 2016-17 या वर्षातही त्यांनी विक्रेत्यांकडून नमुने घेत कारवाई केली होती.

कारवाईनंतर संबंधित कंपन्यांचे नमुने तपासणी करण्यात आली होती. हे नमुने पुर्णपणे अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाल्यानंतर कृषी विभागाने संबंधित कंपन्यांना नोटीसा दिल्या होत्या.

यात काहींनी प्रतिसाद दिला होता. तर इतरांनी कारवाईकडे दुर्लक्ष केले होते. तपासणी नमुने अप्रमाणित आढळल्याचा ठपका ठेवत सर्व 18 कंपन्यांविरोधात शहादा न्यायालयात बुधवारी दावा दाखल करण्यात आला. न्यायालयात कामकाजादरम्यान संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*