उपोषण करणार्‍या महिलांकडून महिला पोलिसाला मारहाण

0

नंदुरबार । दि.14 । प्रतिनिधी-बेकायदेशीररित्या झालेले निलंबन रद्द व्हावे यासह विविध मागण्यांसाठी दि.6 नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण करणार्‍या अंगणवाडी पर्यवेक्षिकेची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असतांना अंगणवाडी पर्यवेक्षिकेची कन्या व सोबत असलेल्या महिलेने महिला पोलीस कर्मचार्‍याला मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच औषधी गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार तालुक्यातील नटावद येथील अंगणवाडी पर्यवेक्षिका सुरेखा आधार बोरसे यांनी त्यांच्यावर बेकायदेशीररित्या व आरोप सिध्द न करता केलेले निलंबन रद्द होवून पुर्वीच्या बिटात रूजू होण्याचे आदेश मिळेपर्यंत, कुपोषणमुक्त अभियानाचा पुरस्कार व खर्च तसेच 2017 चा पुरस्कार व प्रमाणपत्र देण्याचे आदेश मिळेपर्यंत तसेच अन्य शासन निर्णय, आर्थिक प्रलंबित विषय देण्याचे आदेश मिळेपर्यंत जिल्हापरिषदेसमोर दि.6 नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.

अन्याय दूर होईपर्यंत सदर उपोषण सुरू राहील व उपोषण काळात कोणीही शारिरीक, मानसिक व बौध्दिक त्रास दिला व पुनश्च माझ्यावर अन्याय केला तर त्याला जबाबदार महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी बागुल राहील, असा इशारा त्यांनी दिला होता.

दरम्यान आज उपोषणाचा नववा दिवस असल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे सुरेखा आधार बोरसे यांना रुग्णालयात उपचारार्थ घेऊन जाण्याचे सांगण्यात आले.

मात्र, त्यांनी जाण्यास नकार दिल्याने बळाचा वापर करून उपचारासाठी नेत असतांना हर्षदा आधार बोरसे व कोकीळाबाई सर्व रा.वावद यांनी सरकारी कामात अडथळा आणला व सुरेखा बोरसे यांना पोलीसांच्या ताब्यात घेण्यास मज्जाव केला.

हर्षदा हिने महिला महिला पोलीस कर्मचारी बबीता नुरजी देसाई यांच्या हाताला चावा घेवून चापटीने मारहाण केली व शिवीगाळ केली. तसेच हर्षदाने पर्समध्ये ठेवलेल्या 9 ते 10 औषधी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सुरेखा बोरसे, हर्षदा बोरसे व कोकीळाबाई यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गितांजली सानप करीत आहेत.

LEAVE A REPLY

*