शौचालय नसतांना शासनाच्या यादीत नाव

0

नंदुरबार । दि.13 । प्रतिनिधी-तालुक्यातील उमर्दे येथे निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालये बांधलेली नसतांना केंद्र शासनाच्या सर्व्हेक्षण यादीत त्यांच्या घरी शौचालये बांधल्याचे दाखवण्यात आले आहे.

एकटया उमर्दे येथे सुमारे दीडशे लाभार्थ्यांची नावे या सर्व्हेक्षणात आहेत, ज्यांच्याकडे शौचालये नाहीत. याबाबत गुलाब महारु मराठे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सहा महिन्यांपुर्वी तक्रार केली होती.

परंतू त्याची दखल न घेण्यात आल्याने आजपासून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने मात्र सर्व्हेक्षणाची माहिती केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर मराठे यांच्या नावावर शौचालय बांधल्याची नोंद असल्याने त्यात बदल करता येणार नाही, असे उत्तर देवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

सन 2012 मध्ये निर्मल भारत अभियानांतर्गत जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये कुटूंबनिहाय शौचालयासंदर्भात सर्व्हेक्षण करण्यात आले होते. सदर सर्व्हेक्षणात तालुक्यातील उमर्दे या एकटया गावात सुमारे दीडशे लाभार्थ्यांनी शौचालये बांधलेली आहेत, अशी नोंद करण्यात आली आहे.

प्रत्यक्षात यातील एकाही लाभार्थ्याकडे शौचालय नाही, तसेच अनुदानही घेतलेले नाही. याबाबत उमर्दे येथील गुलाब महारु मराठे यांच्यासह सुरेश संपत मराठे, आनंदराव राजाराम मराठे, रविंद्र सदाशिव मराठे, संतोष भिवसन मराठे, संपतसिंग रुपसिंग राजपूत आदींनी जिल्हाधिकार्‍यांकडे 1 एप्रिल 2017 रोजी तक्रारी अर्ज दिला होता.

त्यात म्हटले होते की,निर्मल भारत अभियानांतर्गत त्यांनी कुठलेही शौचालय बांधलेले नसतांना सर्व्हे यादीत त्यांच्या नावापुढे वापर दाखवण्यात आला आहे.

त्यामुळे ही यादी संपुर्णपणे बोगस असून सक्षम अधिकार्‍याकडून चौकशी करण्यात यावी व नवीन सर्व्हे यादी तयार करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

यावर जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता अभियानाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पत्र देवून चौकशीचे आदेश देवून नवीन सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले. परंतू जिल्हाधिकार्‍यांच्या या पत्राला जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता अभियानाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी केराची टोपली दाखवली.

म्हणूनच तक्रारीला सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला असतांनाही त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. म्हणून आज दि. 13 पासून उमर्दे येथील गुलाब महारु मराठे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

याबाबत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता अभियानाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी मराठे यांना लेखी पत्र दिले असून, त्यात म्हटले आहे की, निर्मल ग्राम अभियानांतर्गत सन 2012 मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणानुसार मराठे यांचे सर्व्हेक्षण यादीत 198 क्रमांवर नाव आहे. त्यात आपल्या नावापुढे शौचालये असल्याचे नमुद केले आहे. सदर सर्व्हेक्षणाची माहिती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे त्यात आता कोणताही बदल करता येत नाही, असे उत्तर देवून आपल्यावरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, एकटया उमर्दे या छोटयाशा गावात दीडशेच्यावर लाभार्थ्यांकडे शौचालय नसतांना शौचालयावर वापर दाखवून अनुदान हडप केले जात असेल तर जिल्हाभरातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील तसेच इतर सपाटीवरील भागात काय परिस्थिती असेल? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या लाभार्थ्यांनी शौचालयच बांधले नसेल तर शौचालयाचे अनुदान गेले कुठे? सर्व्हेक्षणाच्या यादीत त्यांच्या नावे शौचालये असल्याचे कोणत्या आधारे दाखवण्यात आले? सर्व्हेक्षण कोणी केले? सर्व्हेक्षणाची पडताळणी कोणत्या अधिकार्‍याने केली? असे अनेक प्रश्न यानिमित्त उपस्थित करण्यात येत आहेत.

दरम्यान, जिल्हयातील 35 हजार शौचालये बोगस दाखविण्यात आल्याचे समजते. मात्र, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. गरीब लाभार्थ्यांच्या नावे अनुदान हडप करुन त्यांना त्यांच्या व्यक्तीगत लाभापासून वंचित ठेवणार्‍या ग्रामसेवक, गटविकास अधिकार्‍यांपासून उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांपर्यंत सर्वांचीच चौकशी करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*