रोटरी वेलनेस सेंटरचे उद्या उद्घाटन

0

नंदुरबार । दि.10 । प्रतिनिधी-आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळ, रोटरी क्लब आणि नंदुरबार जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 5 वाजता रोटरी वेलनेस सेंटर या स्वस्त औषधी दुकानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पहिला आणि अभिनव असा हा उपक्रम नंदुरबारात सुरु होत आहे, अशी माहिती आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आ.रघुवंशी म्हणाले, नंदनगरीच्या जनतेला स्वस्त दरात औषधे मिळून आरोग्य सुविधा पुरवून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आपला मानस होता. यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळ, रोटरी क्लब आणि नंदुरबार जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्यात चर्चा सुरु होती.

यासाठी रोटरी वेलनेस सेंटर ही या संस्थेची नोंदणी करण्यात आली. त्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून जनतेला लागणारी औषधी 10 ते 60 टक्के एवढया कमी दरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येकाला वेलनेस रिटेल कार्ड देण्यात येणार आहेत.

शहरातील दिनेश मेडीकल, गिता मेडीकल, जमजम मेडीकल, किरण मेडीकल, खुराळ मेडीकल, लाईफ केअर मेडीकल, निलेश मेडीकल, ओम मेडीकल्स, पंकज मेडीकल, पूजा मेडीकल, रोटरी वेलनेस सेंटर, साईसेवा मेडीकल, विजय शांती मेडीकल, वैष्णवी मेडीकल याठिकाणी हे वेलनेस रिटेल कार्ड स्विकारले जाणार आहेत. याशिवाय रोटरी वेलनेस सेंटरमध्ये रक्तदाबाची मोफत तपासणी, वजन तपासणी मोफत केली जाणार असून मधुमेहाची तपासणी 20 रुपयांत केली जाणार आहे, असेही आ.रघुवंशी यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सीलचे उपाध्यक्ष विनय श्रॉफ म्हणाले, या वेलनेस सेंटरमध्ये डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांएवढीच उच्चप्रतीची व गुणवत्तेची तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांची जेनेरीक औषधी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय वेलनेस सेंटरमध्ये औषधोपचार, आरोग्य सेवा, औषधी हताळीबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 500 रुपये डिस्काऊंट कुपन्स देण्यात येणार आहे.

डॉ.विशाल चौधरी म्हणाले, रोटरी क्लब आणि नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत शहरात डायलिसीस सेंटरची उभारणी केली आहे. एक्सरे, सोनोग्राफी सेंटर सुरु केले आहे. आता स्वस्त दरात औषधी जनतेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य शिबीर व ग्राहक सेवा कक्षाद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी सुनील चौधरी, निलेश तवर आदी उपस्थित होते.

रोटरी वेलनेस सेंटर या स्वस्त औषधी विक्री केंद्राचे उद्घाटन नुतन कन्या विद्यालयासमोर आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष यशवंत स्वर्गे, उद्योगपती मदनलाल जैन, महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सीलचे उपाध्यक्ष विनय श्रॉफ, नंदुरबार जिल्हा कमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव सुनील चौधरी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळ, जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, रोटरी क्लब आणि रोटरी सेवा फाऊंडशनने केले आहे.

LEAVE A REPLY

*