तलाठी, मंडळ अधिकार्‍यांना डांबून ठेवल्याप्रकरणी ललित वारुडेसह 50 जणांविरुद्ध गुन्हा

0

पाष्टे । दि.9 । वार्ताहर-वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी उशिरा आल्याचा राग येवून तलाठी व मंडळ अधिकार्‍याला पीक संरक्षण सोसायटी कार्यालयात डांबून ठेवल्याप्रकरणी मुडावद सरपंच प्रदीप महाजन यांच्यासह पं.स.चे माजी उपसभापती ललित वारुडे आणि इतर 50 जणांविरुध्द शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मुडावद, ता. शिंदखेडा बसस्टॅण्ड चौकात दि. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 12.30 दरम्यान वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी म्हळसर तलाठी पृथ्वीराज गिरासे व मंडळ अधिकारी एस.एन.नेरकर हे उशिराने आले म्हणून त्यांच्याशी ललित वारुडेसह 50 जणांनी वाद घातला.

या शाब्दीक वादाच्यावेळी 50 जणांनी गर्दी करुन महसूल अधिकारी यांच्या दैनंदिन शासकीय कामकाजात अडथळा आणला व तलाठी गिरासे व मंडळ अधिकारी नेरकर या दोघांना पीक संरक्षण सोसायटीच्या खोलीत डांबून ठेवले.

याबाबत तलाठी पृथ्वीराज गिरासे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन जिल्हाधिकार्‍यांचा जमावबंदी आदेशाचे उल्लंघन व भादंवि 143, 342, 353 व मुंबई पोलिस अ‍ॅक्ट कलम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे ललित वारुडे, सरपंच प्रदीप महाजन, बारकू हिरामण कोळी, मिलिंद शालिक कोळी, सुनिल लांडगे, राजू महाजन व इतर 40 ते 50 जणांविरुध्द आज दि. 9 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोसई हांडोरे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*