नगराध्यक्ष 10 तर नगरसेवकपदासाठी तीन लाख खर्चाची मर्यादा

0

नंदुरबार । दि.9 । प्रतिनिधी-नंदुरबार ही अ वर्ग नगरपालिका असल्याने नगराध्यक्ष पदासाठी खर्चाची मर्यादा 10 लाख रूपये असून नगरसेवकपदासाठी खर्चाची मर्यादा तीन लाख रूपये राहणार आहे. उर्वरीत नवापूर व तळोदा या क वर्ग नगरपालिका असल्यामुळे तेथील नगराध्यक्ष पदाचा खर्च मर्यादा पाच लाख व नगरसेवकपदाचा खर्च दीड लाख रूपये निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर आचारसंहितेची कडक अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सनियंत्रण समिती गठीत करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर व तळोदा नगरपालिकांच्या निवडणुकांचा तसेच शहादा येेथील एका प्रभागाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

यासाठी दि.13 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 यावेळेत मतदान घेण्यात येणार असून दि.14 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

निवडणुकीत उमेदवारांना नामनिर्देशनत्र दाखल करतांना आवश्यक प्रमाणपत्राच्या सत्यप्रती, पक्षातर्फे निवडणुक लढवित असल्याचे जोडपत्र जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, शौचालय वापराबाबत प्रमाणपत्र, गुन्हेगारी पार्श्वभुमिबाबतचे शपथपत्र आदी सादर करावे लागणार आहेत.

याशिवाय उमेदवारांना तंबू टाकणे, प्रचार रॅली काढणे, जाहीर सभा घेणे, रिक्षा फिरवणे, भोंगा लावणे आदींची परवानगी घ्यावी लागते, या सर्व परवानग्या मिळविण्यासाठी उमेदवारांना त्रास होवू नये म्हणून तहसिल कार्यालयात एक खिडकी योजना सुरु करण्यात येणार असून सर्व परवानग्या एकाच ठिकाणी उमेदवारांना मिळू शकतील.

यंदा नामनिर्देशनत्र दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन राहणार आहे. त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाने संगणक प्रणाली विकसीत केली आहे. या संगणक प्रणालीत सर्व माहिती भरून त्याची प्रिंट काढून निवडणुक अधिकार्‍यांकडे विहित वेळेत सादर करावे लागणार आहे. यासाठी नामनिर्देशनत्र व शपथ पत्र भरण्यासाठी मार्गदर्शनासाठी प्रत्येक पालिकेत एक मदत केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

डॉ.कलशेट्टी पुढे म्हणाले की, आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुक सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून या समितीद्वारे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

नगरपालिका मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. आचारसंहिता भंग तक्रार स्विकारण्यासाठी व त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापनादेखील करण्यात येणार आहे.

याशिवाय तीनही पालिकांच्या निवडणूकीसाठी अप्पर जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी पोलीस अधीक्षक संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, नगररचनाकार राहूल वाघ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*