शहादा दंगलीतील अनेक आरोपी अद्यापही मोकाट

0

शहादा । दि.07 ।-पाणी भरण्याच्या टँकरवरून 14 व 15 जून रोजी शहाद्यात उसळलेल्या दंगलीत लुटमार, जाळपोळ, शासकीय मालमत्तेच्या नुकसान करण्यात येवून पोलीसांनाही टार्गेट करण्यात आले होते.

या घटनेत शहादा पोलीसात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असून दोन्ही गुन्ह्यात 72 मुख्य आरोपींसह अन्य 400 ते 500 आरोपींचा समावेश आहे.

मात्र, घटना घडल्यापासून आतापर्यंत केवळ 20 आरोपींनाच अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. ज्या घटनेने शहराचे वातावरण तंग झाले होते, ज्या घटनेत पोलीसांवरही हल्ला चढविण्यात आला, त्या घटनेतील आरोपींवर कारवाई करण्यास शहाद्याचे पोलीस टाळाटाळ का करीत आहेत? शहरात बरेच आरोपी उजळमाथ्याने अजूनही मोकाटपणे फिरत असतांना पोलीसांना का दिसत नाही? असा सवाल शहरातून उपस्थित होत आहे. जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पेालीस अधिक्षक संजय पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरीक व्यक्त करीत आहेत.

शहाद्यात 14 जून 2017 रोजी गरीब नवाज कॉलनी परिसरात पाण्याच्या टँकरवरून आजी-माजी नगरसेवकांमध्ये शाब्दिक खडाजंगी होवून त्याचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत झाले होते.

या हाणामारीत एमआयएम व काँगे्रस या दोन्ही पक्षांचे गट समोरासमोर भिडले होते. त्यात दोन्ही गटातील चार ते पाच गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, हा वाद विकोपाला जावून या घटनेत एमआयएम समर्थक एका नगरसेवकाची हत्या झाली होती.

या हत्येचे पडसाद शहरात उमटले होते. खेतिया रोड परिसर, गरीब नवाज कॉलनी परिसर या मुस्लीमबहुल वसाहतींमध्ये या घटनेचे लोण पसरले होते. अर्थात ही घटना या समाजातील दोन गटांमध्ये घडली होती.

मात्र, या घटनेने शहादेकरांची झोप उडाली होती. कारण, हत्या झालेल्या नगरसेवकाच्या समर्थकांनी या हत्येस जबाबदार धरून त्यांची व्यापारी दुकाने व घरांची लुटमार करून तोडफोड व जाळपोळ केली होती.

ज्यांचा घटनेशी काहीही संबंध नव्हता अशा लोकांची घरेही संशयावरून समाजकंटकांनी लुटमार करीत जाळून टाकली होती. पोलीसांदेखत या घटना घडत असतांना पोलीसही हतबल झाले होते. दरम्यान, पोलीसांवरही समाजकंटकांनी रोष काढला होता. त्यात उपविभागीय पोलीस अधिक्षकांसह पाच पोलीस जखमी झाले होते.

पोलीस वाहनाचीही तोडफोड करण्यात आली होती. पोलीसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 19 राऊंड फायर केले होते.

या घटनेत पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांच्या फिर्यादीवरून 42 मुख्य आरोपी व अन्य 300 जणांविरोधात तर नगरसेवक रियाज कुरेशी यांच्या फिर्यादीवरून 30 मुख्य आरोपी व अन्य 150 जणांविरोधात लुटमार, जाळपोळ, दहशत निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, पोलीसांवर दगडफेक करून जखमी करणे, पोलीस वाहनासह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी गंभीर कलमान्वये शहादा पोलीसात गुन्हे दाखल केले आहेत.

पोलीसांनी त्यानंतर कारवाई करीत आरोपींविरोधात अटकसत्र सुरू केले. सुरूवातीची कारवाईनंतर संथगतीने राहिली. त्यामुळे घटनेच्या सहा महिन्यात 72 मुख्य आरोपींपैकी अन्य 500 आरोपींपैकी पोलीसांनी आजपर्यंत केवळ 20 जणांवर कारवाई केली आहे. अन्य आरोपींबाबत पोलीसांकडून मवाळ धोरण स्विकारण्याचे दिसत आहे.

पोलीसांनी ज्या आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील काही आरोपी नंदुरबार, अक्कलकुवा व उर्वरीत शहाद्यातील आहेत.

दरम्यान, नगरसेवक रियाज कुरेशी यांच्या फिर्यादीतील साजिद पिंजारी नामक संशयितास तीन महिण्यापूर्वी पोलीसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, जाबजबाब नोंदवून त्यास सोडून देण्यात आले होते. त्याच गुन्ह्यातील अन्य अटकेतील 7 आरोपी न्यायालयीन कस्टडी असतांना पिंजारीस सोडण्याचे रहस्य अजूनही गुलदस्त्यात आहे.

सदर संशयित सध्या पोलीसांना मिळत नसल्याचे समजते. मात्र, तो मिळत नाही की जाणूनबुजून त्याच्यावर पोलीस कारवाई करण्याचे टाळतात हेही एक कोडे आहे.

सदर घटनांमधील अनेक आरोपी शहरात मोकाट फिरत असल्याचे नागरीकांना दिसतात. परंतू पोलीसांना दिसत नाही, यामागचे रहस्य काय?

शहाद्यात एमआयएमचे खा.ओवैसी आठवडाभरापूर्वीच येवून गेले. त्यांच्या कार्यक्रमातही अनेक संशयित मोकाटपणे फिरत असतांना पोलीस मात्र त्यांच्या संरक्षणास असल्याचे चित्र दिसत होते.

अक्कलकुवा नगरपंचायत निवडणूकीतही काही संशयित प्रचारासाठी उजळमाथ्याने फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले. तरीही पोलीसांकडून कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून आले.

पोलीसांकडून अशा गंभीर घटनांमध्ये संशयितांवर कारवाई करण्याऐवजी आपले ‘इप्सित’ साध्य करण्यासाठी होणारी टाळाटाळ कायद्याचा व खाकी वर्दीचा धाक कमी होत चालल्याचे द्योतक ठरत आहे.

शहराच्या शांततेसाठी पोलीसांनी चुप्पी न साधता गंभीर घटनांमधील संशयितांवर वेळीच कारवाईअस्त्र अवलंबणे सर्वांचेच हिताचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

*