शेतकर्‍याची 47 लाखांत फसवणूक : चौघा विदेशी ठगांविरुद्ध गुन्हा दाखल

0

नंदुरबार । दि.2 । प्रतिनिधी-नवापूर तालुक्यातील झामणझर येथील शैलेश प्रमोद मावची यांना 5.5 मिलीयन डॉलरचे अमिष दाखवून विविध बँक खात्यांवर पैसा भरण्यास सांगून त्यांची 47 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात चार विदेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शैलेश प्रमोद मावची हे सुशिक्षीत शेतकरी असून दि.12 मे 2017 रोजी त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मिसेस रोज मेरी लीवीस या नावाने मॅसेज करण्यात आला.

त्यात 5.5 मिलीयन डॉलर इतकी रक्कम तुमच्या देशातील गरीबांना द्यायची असून ईमेलने संपर्क साधावा, असे आवाहन केले. या मॅसेजला ईमेलवर रिप्लाय केल्यानंतर त्यांना रिप्लाय आला की, समोरील व्यक्ती ही कॅनडाची रहिवासी असून तिला लुकेमिया आजाराने ग्रासले आहे.

तिचा पती वारला आहे. मुलबाळ नसल्याने माझ्या पतीची व माझी संपत्ती तुमच्या गरीब अनाथालय, विधवा यांना चॅरीटी म्हणून द्यायची आहे.

माझ्या वकीलांशी संपर्क करावा. त्यानंतर संपर्काची मालिका सुरू करून बँक मिटींग, इंटरनॅशनल पेमेंट चॅनल, रिझर्व्ह बँकची प्रोसेसिंग फी, विविध प्रकारचे टॅक्स भरणे अशा प्रकारे विविध भुलथापा देवून श्री.मावची यांना दि.17 मे पासून विविध बँक खात्यांवर वेळोवेळी रक्कम भरण्यास सांगण्यात आली.

त्यांनी सदर 47 लाख 10 हजार इतकी रक्कम त्यांच्या शिक्षणासाठी वडिलांनी जमा केलेल्या 21 लाख 42 हजार व इतर रक्कम ही ओळखीच्या 17 लोकांकडून वेळोवेळी उसनवार घेतली आहे.

इतकी रक्कम भरून झाल्यावर अजून 10 लाख रुपये जीएसटी व आर.बी.आय. बँकेचे इतर चार्जेससाठी भरण्यास सांगण्यात आले. यावेळी शैलेश मावची यांना शंका आल्याने त्यांनी स्वतः दिल्ली येथे जाऊन आर.बी.आय.कडे याबाबत चौकशी केली असता अशाप्रकारे आर.बी.आय.कडून कुठलीही चार्जेस घेतले जात नाही, असे सांगितल्याने मावची यांना आपली मोठी फसवणूक झाल्याचे समजले.

त्यामुळे त्यांनी नवापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मिसेस रोज मेरी लेवीज, बॅरीस्टर बेनेडीक्ट स्मिथ, मिस्टर पॉल जॉन्स, इमजी जाने या अनोळखी व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर झाला असल्याने पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी सदर गुन्हा तपासासाठी सायबर सेल नंदुरबार यांच्याकडे सोपविला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर नवले करीत आहेत. जिल्ह्यातील नागरीकांनी अशा प्रकारच्या मोठा आर्थिक अमिषांना व प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*