पोलिसांची अकार्यक्षमता व ‘अर्थ’पूर्ण संबंधामुळे दारु तस्करीला पाठबळ

0

शहादा । दि.01 ।-मध्यप्रदेशातील बनावट देशी-विदेशी दारुची विनापरवाना होणारी तस्करी शहादा तालुक्यासाठी ‘शाप’ ठरत आहे.

या दारु तस्करीवर आळा बसविण्यासाठी पोलीस प्रशासनासह उत्पादन शुल्क विभागालाही अजून पूर्णपणे यश मिळाल्याचे दिसत नाही. त्यातही उत्पादन शुल्क विभागाची अधून-मधून होणारी कारवाई दारू तस्करांसाठी अडचणीची ठरत आहे.

मात्र, ज्या म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बनावट दारूची बिनधास्त तस्करी होत आहे, त्या म्हसावद पोलीसांची ‘अकार्यक्षमता’ देखील या तस्करीला पाठबळ देणारी ठरत आहे.

काल दि.30 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने 60 लाखांचा मद्यसाठा म्हसावद पोलीसांच्या हद्दीतून फत्तेपूरनजीक पकडला.

यावरून म्हसावद पोलीसांची ‘अकार्यक्षमता’ व ‘आर्थिक हित’ या तस्करीस कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच या दारू तस्करीत ‘दोघा’ पोलीसांचा कथितरित्या सहभागाची चर्चाही अजून सुरू असल्याने कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस प्रमुखांनी या घटनेचे गांभीर्याने पर्दाफाश करणे महत्वाचे ठरणार आहे.

दि.30 ऑक्टोबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना त्यांच्या खबरींकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मध्यप्रदेशातून (पानसेमल) येथून महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत म्हसावदमार्गे धडगांवकडे बनावट देशी-विदेशी दारूची तस्करी होणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली.

या माहितीनुसार ‘राऊशु’च्या अधिकार्‍यांनी रात्री म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत फत्तेपूर या आदिवासी लोकसंख्येच्या गावानजीक अंधारात सापळा लावला. रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास एक ट्रक संशयास्पदरित्या जातांना त्यांना दिसला.

त्यांनी पाठलाग करून ट्रक पकडल्यानंतर या ट्रकच्या तपासणीत बनावट दारूचा साठा आढळून आला. 14 लाख किंमतीचा ट्रक व 60 लाखाच्या दारुचा साठा असा सुमारे 74 लाखांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी जप्त केला.

सोबत दोघांना अटक केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडीही देण्यात आली. ‘राऊशु’ विभागाची ही सर्वात मोठी कारवाई असून या कारवाईने दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

उत्पादन शुल्क विभागाची ही कारवाई म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली. या मोठ्या कारवाईमुळे म्हसावद पोलीसांची झोप उडाली आहे.

कारण हा बनावट मद्यसाठा पानसेमल (मध्यप्रदेश) हून खेतियामार्गे म्हसावद व तेथून फत्तेपूरमार्गे थेट धडगांवकडे जात होता. यात ‘बॉम्बे स्पेशल व्हिस्की’ नावाची बनावट विदेशी दारू होती.

म्हसावद पोलीसांच्या हद्दीत उत्पादन शुल्क विभाग एवढी मोठी कारवाई करीत असतांना म्हसावद पोलीस एवढे सुस्त कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अर्थात दारू तस्करीत म्हसावद पोलीसांचा वरदहस्तदेखील कारणीभूत ठरत असल्याने बिनबोभाट त्यांच्या हद्दीतून होणारी दारू तस्करी बरेच काही सांगून जाते.

शिवाय, बनावट दारू तस्करीसाठी धडगांवकडे जाण्यासाठी म्हसावद हे सेंटर असल्याने मध्यप्रदेशातून खेतिया येथून सुलतानपूर, सुलवाडा, म्हसावद, फत्तेपूरमार्गे धडगांव आणि खेतिया, खेड, मुबारकपूर, आडगांव, गणोर टवळाई मार्गे म्हसावद, फत्तेपूर व तेथून धडगांव अशा दोघा मार्गांवरून बनावट दारूची तस्करी करणे तस्करांसाठी सोपे आहे.

मात्र, म्हसावद पोलीसांशिवाय दारू तस्करी होणे शक्य नाही. त्यामुळेच म्हसावद पोलीसांचा ‘अर्थ’पूर्ण आशीर्वाद’ असल्याने दारू तस्करी होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.

उत्पादन शुल्क विभागाने त्यांच्या हद्दीत फत्तेपूर गावानजीक केलेली कारवाई त्याचे उदाहरण स्पष्ट करणारे आहे. विशेष म्हणजे रात्रीच्यावेळी पोलीसांची गस्त सुरू असते.

म्हसावद पोलीसांनीदेखील महत्वाच्या सिमांवर पेट्रोलिंग लावली असते तरीही 60 लाखाचा बनावट मद्यसाठा त्या पोलीसांना का दिसला नाही? ‘राऊशु’ अधिकारी त्यांच्या हद्दीत ही कारवाई करीत असतांना म्हसावदचे एपीआय राकेश चौधरी अंधारात कसे होते असा संशय करणारा प्रश्न उपस्थित होत आहे.

यापूर्वीही म्हसावद हद्दीतच बनावट दारू तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या असतांना या पोलीसांकडून यावर आळा बसविण्याऐवजी त्यात वाढच होत आहे.

म्हसावद पोलीसांची ‘अकार्यक्षमता व आर्थिक हित’ यामुळेच अशा घटना वाटत असल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेची कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी गंभीर दखल घेणे महत्वाचे ठरणार आहे.

दारू तस्करीत ‘त्या’ दोघा पोलीसांचा सहभाग
उत्पादन शुल्क विभागाने 60 लाखाची बनावट दारूचा ट्रक सातपुडा कारखान्याच्या ‘डिस्टीलरी’ येथे त्यांच्या कार्यालयात आणल्यानंतर या घटनेची ‘त्या’ दोघा पोलीसांना माहिती मिळाली.

त्यांनी रात्रीच्यावेळी डिस्टीलरी येथे धाव घेत प्रकरण ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न केला. काहीही करून प्रकरण मिटविण्यासाठी ‘खाकी वर्दीचा’ उपयोग करून घेण्याचा प्रयत्न झाला.

मात्र, उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी ‘मॅनेज’ करण्यास नकार दिल्याने त्या दोघा पोलीसांचा हिरमोड झाल्याचे समजते. यावरून दारू तस्करीत ‘त्या’ दोघा पोलीसांचा कथितरित्या सहभाग असल्याचे समजते.

पोलीस वर्तूळातही ‘त्या’ दोघांविषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा खराब करणारे ते ‘दोघे’ पोलीस कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

*