Photo Gallery : शहिद मिलिंद खैरनार यांना अखेरचा निरोप

0

नंदुरबार । दि.12 । प्रतिनिधी-वीरजवान शहीद मिलींद खैरनार यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह हजारो नागरीक साश्रूनयनांनी या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.

‘शहीद मिलींद अमर रहे’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी बोराळे परिसर दुमदुमून गेला होता.

उपस्थितांमध्ये हजारो युवक उपस्थित होते. सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास शहीद मिलींद यांचे पार्थिव बोराळे येथे एअरफोर्सच्या विशेष वाहनाने आणण्यात आले.

त्यांच्या राहत्या घरी सुमारे अर्धा तास त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर सजवलेल्या ट्रॅक्टरवर त्यांचे पार्थिव बोराळे गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या मैदानात एका फुलांनी सजवलेल्या मंचावर सर्वांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी किमान 4 ते 5 हजार महिला व पुरूष, बालगोपाल उपस्थित होते.

त्यादरम्यान, उपस्थित सर्वांनी आपल्या गावाचा सुपूत्र असलेल्या शहीद मिलींदला साश्रू नयनांनी श्रद्धांजली अर्पण केली. लष्करी इतमामाप्रमाणे बंद पेटीत असलेले पार्थिव एअरफोर्सच्या जवानांनी अंत्यदर्शनासाठी तयार केलेल्या मंचावर आणले.

सर्वप्रथम एअरफोर्सच्या प्रमुख अधिकार्‍यांनी शहीद मिलींदच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्यावतीने पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांनीदेखील पुष्पचक्र अर्पण केले.

आ.डॉ.विजयकुमार गावीत, आ.चंद्रकांत रघुवंशी, आ.शिरीष चौधरी, जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, नंदुरबारचे उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जि.प. सदस्य अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे, पोलीस उपअधिक्षक रमेश पवार यांच्यासह पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

अंत्यदर्शनासाठी गावातील सरदार पटेल गृप, विविध शहर व ग्राम गुजर मित्रमंडळाचे सदस्य, राजपूत तरूण मंडळ आदी विविध संस्थांच्या युवक कार्यकर्त्यांनी आपापले स्वयंसेवक तयार करून व्यवस्था केलेली होती.

संपूर्ण गावामध्ये युवकांनी आलेल्या प्रत्येकाला व्यवस्थित उभे राहण्यासाठी मार्गदर्शन केले. गावाच्या सिमेपासून तर अंत्यविधीच्या ठिकाणापर्यंत संपूर्ण परिसर रांगोळ्या, पुष्पमाला आदींनी सजवण्यात आलेला होता.

यामध्ये प्रामुख्याने हेमंत पाटील, अमोल पाटील, हिरालाल पाटील, विशाल पाटील, रघुनाथ पाटील, सरपंच पुनमचंद निंबा पाटील, संदीप पाटील आदींनी संपूर्ण व्यवस्था केलेली होती.

यावेळी मालेगांव येथील नजीर शेख यांनी ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ हे गीत म्हणून देशभक्तीचे वातावरण तयार केले. तर खोंडामळी शाळेतील विद्यार्थी भारत माता व जवानांच्या वेशभूषा करून त्याठिकाणी उपस्थित होते व ‘भारत माता की जय’, ‘शहीद मिलींद अमर रहे’ अशा घोषणा देत होते.

यावेळी पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांनी शहीर मिलींद यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी ते म्हणाले की, वयाच्या 18 व्या वर्षी एअरफोर्समध्ये भरती होऊन शहीद मिलींद यांनी वयाच्या 33 वर्षापर्यंत सलग 15 वर्षे देशाची सेवा केली.

एअरफोर्समध्ये एन.एस.जी. गरूड या एकार्थाने मोठ्या असलेल्या पथकांमध्ये आपल्या कर्तृत्वावर प्रवेश मिळवला व दहशतवाद्यांशी मुकाबला करतांना शहीद मिलींद यांना वीरमरण आले.

गावाच्या दृष्टीने, कुटुंबियांच्या दृष्टीने तसेच देशाच्या दृष्टीनेदेखील हा प्रसंग अत्यंत दुःखद असला तरी सर्वांना गर्व वाटावा असा आहे. शहीद मिलींद यांचे बलिदान वाया जाणार नाही.

देशाचे शत्रू असणार्‍या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी सर्वांना संघठीत व्हावे लागेल असे सांगून शहीद मिलींद यांच्या स्मृतींना त्यांनी अभिवादन केले.

शासकीय इतमामानुसार पोलीस दलातर्फे व एअरफोर्सतर्फे बंदूकीच्या तीन फैरी झाडून शहीद मिलींद यांना सलामी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर लपेटलेला भारतमातेचा तिरंगा ध्वज त्यांचे वडील किशोर खैरनार यांच्याकडे सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला.

सायंकाळी साडेसहा वाजता शहीद मिलींद यांना मनोमन मुक श्रद्धांजली अर्पण करत आलेले सर्व नागरीक व नेते आपापल्या स्थानिय रवाना झाले.

नंदुरबार जिल्ह्यात अशा पद्धतीचा प्रसंग प्रथमच सर्वांना अनुभवायला मिळाला. यातून युवकांनी प्रेरणा घेवून गावात अनेक उपक्रम राबवण्याचादेखील संकल्प केला.

संपूर्ण कुटुंबिय हे शोकसागरात बुडालेले होते. मिलींदचे पार्थिव पोहोचण्यापूर्वीच त्याची बहिण व मेव्हणे त्याठिकाणी पोहोचले. त्यांना आपला शोक अनावर झालेला होता. गावात सर्वत्र शांतता होती. ठिकठिकाणी रांगोळ्या काढलेल्या होत्या व मिलींदच्या पार्थिवाची सर्वजण वाट बघत होते.

LEAVE A REPLY

*