लाख मोलाची माणसं जमविण्यात समाधानः ना.पाटील

0

शहादा । ता.प्र.-विचारांशी बांधिलकी आणि जनतेशी असलेली ईमानदारी व्यक्तीस यशस्वी बनविते. जीवनात लाख रूपये कमविण्यापेक्षा लाख मोलाची माणसं जमविणे हे खरे समाधान आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले.

येथील श्री.पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशन व पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्यावतीने स्व.पी.के.अण्णा पाटील जयंतीदिनी आयोजीत विचारमंथन, किसानदिन व पुरूषोत्तम पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील होते. यावेळी मंचावर पुरस्कारार्थी पद्मश्री ना.धों. महानोर, राजवाडे संशोधन मंडळाचे प्रतिनिधी मदनलाल मिश्रा, संजय मुंदडा, आ.डॉ.रामकृष्ण दोणगे, आ.चंद्रकांत रघुवंशी, आ.उदेसिंग पाडवी, आ.शिरीष चौधरी, सातपुडा कारखान्याच्या माजी उपाध्यक्षा श्रीमती कमलताई पाटील, उपनगराध्यक्षा सौ.रेखाबाई चौधरी, जि.प. अध्यक्षा सौ.रजनीताई नाईक, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, अखिल भारतीय गुर्जर महासभेचे अध्यक्ष अ‍ॅड.रामसरण भाटी, जनरल सेक्रेटरी डॉ.जिलेसिंग कपासिया, दिल्ली प्रदेश गुर्जर महासभा अध्यक्ष इंद्रराजसिंग चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांना अभिवादन करण्यात आले. सत्कारार्थी पुरूषोत्तम पुरस्कार प्राप्त पद्मश्री ना.धों.महानोर आणि इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळ धुळेचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा यांना प्रत्येकी एक लाख रूपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल-श्रीफळ देऊन अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले.

ना.पाटील पुढे म्हणाले, जनतेची सहनशीलता मोठ्या प्रमाणात असते. राज्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. हक्क प्राप्त करण्यासाठी आंदोलन व चळवळ उभी करावी लागते.

शिवसेनेने आपल्याला हक्कासाठी आक्रमकता शिकवली. सत्ता असो वा नसो जनता आणि शेतकर्‍यांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आपण स्वतः कधीही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास तत्पर आहोत.

स्व.अण्णासाहेबांनी रुजवलेली शिस्त, दान आणि कार्याची प्रेरणा यशासाठी उपयुक्त आहे. पक्ष कोणताही असो मात्र, राज्यकर्त्यांनी जनतेच्या विकासाला प्राधान्य द्यावे.

श्री.पाटील यांनी भाषणात सामूहिक विवाह काळाची गरज असल्याचे सांगून सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टिका केली. त्यांनी जलयुक्त शिवार योजना, बॅरेजेस, विविध प्रकल्पांसाठीच्या निधी, जीएसटी आदी विषयांवर आपल्या शैलीतून मनोगत व्यक्त केले. पद्मश्री कवी महानोर व इतिहास संशोधन संस्थेस आपल्या हस्ते पुरस्कार देण्यात आल्याने आपण धन्य झालो आहोत, असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी पुरूषोत्तम पुरस्कारप्राप्त ना.धों. महानोर म्हणाले, शेती-पाण्याच्या नियोजनाचे कार्य छत्रपती शिवरायांच्या विचारातून पुढे आले आहे. महाराजांचे सूत्र होते. शेतकरी जगला तर राष्ट्र जगेल. सरकारने या गोष्टींचा विचार करून विकासाच्या योजना राबवाव्यात. पाण्याचे शेती व जीवनातील महत्व जाणून धोरणात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करून पाण्याचा विचार करणार्‍या स्वर्गीय पी.के. अण्णांच्या नावाने मिळालेला पुरस्कार पूज्य साने गुरूजींच्या चरणी अर्पण करीत असल्याचे सांगितले.

यावेळी आ.शिरीष चौधरी, आ.चंद्रकांत रघुवंशी, आ.उदेसिंग पाडवी, आ.डॉ.रामेश्वर दोणगे, रामसरण भाटी, संजय मुंदडा यांची समयोचित भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणात दीपकभाई पाटील म्हणाले, समाजातील शेवटचा घटक समृद्ध व्हावा आणि तो ताठ मानाने उभा रहावा यासाठी स्व.अण्णासाहेब सतत कायरत राहिले. त्यांनी परिसरात दातृत्वाची संस्कृती रुजवली. संघशक्तीने प्रतिकुलतेवर मात करता येते ही शिकवण दिले. त्यांच्या कार्याच्या स्मरणासाठी विचारमंथन व किसानदिन आणि पुरस्काराचे वितरण केले जाते.

प्रास्ताविक समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील यांनी केले. सूत्रसंचलन प्राचार्य शरद पाटील यांनी केले. आभार प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांनी मानले. संपूर्ण दिवसभर चाललेल्या कार्यक्रमास खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, लोकनायक जयप्रकाश सूतगिरणीचे उपाध्यक्ष रोहिदास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील, दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रविंद्रसिंग रावळ, सातपुडा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रेमसिंग आहेर, पं.स. सभापती दरबारसिंग पावरा, माजी उपसभापती बापूजी जगदेव, माजी उपनगराध्यक्ष दीपक पटेल, अरविंद कुवर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अरूण चौधरी, उद्योजक रविंद्र चौधरी, पू.सा.गु.मंडळाचे उपाध्यक्ष किशोर पाटील, सातपुडा कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, लखन भतवाल, कुणाल वसावे, प्रमोद गानू, प्रा.एल.एस. सैय्यद उपस्थित होते.

शहादा येथे किसान दिनानिमित्त पद्मश्री ना.धों.महानोर व इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळ धुळेचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा यांना पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान करतांना ना.गुलाबराव पाटील, समवेत सातपुडा कारखान्याच्या माजी उपाध्यक्षा श्रीमती कमलताई पाटील, दीपक पाटील, संजय मुंदडा, आ.डॉ.रामकृष्ण दोणगे, आ.चंद्रकांत रघुवंशी, आ.उदेसिंग पाडवी, आ.शिरीष चौधरी, उपनगराध्यक्षा सौ.रेखाबाई चौधरी, जि.प. अध्यक्षा सौ.रजनीताई नाईक, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, अखिल भारतीय गुर्जर महासभेचे अध्यक्ष अ‍ॅड.रामसरण भाटी, जनरल सेक्रेटरी डॉ.जिलेसिंग कपासिया, दिल्ली प्रदेश गुर्जर महासभा अध्यक्ष इंद्रराजसिंग चौधरी आदी.

 

LEAVE A REPLY

*