नंदुरबार तालुक्यातील ग्रा.पं.साठी आज मतदान

0

नंदुरबार । दि.6 । प्रतिनिधी-तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी उद्या दि. 7 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दरम्यान, मतदानासाठी घेण्यात येणार्‍या शाळांना कुठलीही पूर्वसुचना प्रशासनातर्फे देण्यात आली नसल्याने निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर शाळा सोडण्यात आल्या. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी उद्या दि. 7 रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील 270 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून 45 आचारसंहिता पथक तयार करण्यात आले आहेत. तसेच पाच पथक राखीव ठेवण्यात आले आहेत.

मतदान प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच खाजगी शाळांमध्ये राबविण्यात येते. यासाठी एक दिवसाआधी संबंधीत शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे व मतदानाच्या दिवशी सुटी देण्याचे नियोजन आतापर्यंत होत होते.

परंतू तालुक्यातील काही मतदान केंद्रांना संबंधीत विभागाने शाळेला सुटी देण्याचे किंवा सकाळच्या सत्रात घेण्याचे कुठलेही आदेश दिले नाही. त्यामुळे आज सर्व शाळा नियमीत वेळेवर सुरु होत्या.

दरम्यान, निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना आज निवडणूकीचे साहित्य घेवून संबंधीत मतदान केंद्रांवर पाठविण्यात आले.

परंतू तेथे कर्मचारी पोहचल्यावर संबंधीत मतदान केंद्र असलेल्या शाळा नेहमीप्रमाणे सुरु होत्या. त्यामुळे गोंधळ झाला. मतदान कर्मचार्‍यांनी जेव्हा शाळा प्रशासनाला याबाबत माहिती दिली तेव्हा त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधून शाळा सोडण्याचे व उद्या मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर केल्याचे सांगितले.

त्यानंतर शाळा सोडण्यात आल्या. मात्र, यामुळे संबंधीत शाळांमध्ये काही काळ गोंधळ उडाला. निवडणूक कर्मचार्‍यांनादेखील काही काळ शाळेत ताटकळत उभे रहावे लागले. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

LEAVE A REPLY

*