‘जलयुक्त शिवार’ची कामे तत्काळ पूर्ण करा ; विभागीय आयुक्त महेश झगडे

0
नंदुरबार / जलयुक्त शिवार अभियानाच्या 2016- 2017 मधील कामांना संबंधित सर्व विभागांनी समन्वयातून गती देत ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश नाशिक विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसामुंडा सभागृहात आज आढावा बैठक घेण्यात आली होती.
त्यावेळी आयुक्त झगडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घनश्याम मंगळे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील, नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त मित्रगोत्री यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

आयुक्त झगडे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानातील कामांमध्ये लोकसहभाग वाढविला पाहिजे. येत्या पावसाळ्यापूर्वी जलयुक्त शिवार अभियानातील कामे तत्काळ पूर्ण करीत पावसाचा थेंब थेंब अडवित शाश्वत जलसाठा निर्मितीवर भर देण्यात यावा.

तसेच शासकीय यंत्रणांनी नेमून दिलेल्या कामांची प्रशासकीय प्रक्रिया विहित वेळेत पार पाडून ही कामे वेळेत पूर्ण करावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आयुक्त झगडे यांनी मागेल त्याला शेततळे, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, पीक कर्ज पुनर्गठन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी पॉवर पॉईट प्रेझेंटशनच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरु असलेल्या विकास कामांची माहिती दिली.

LEAVE A REPLY

*