आठवडाभरात भारनियमनापासून मुक्ती

0

नंदुरबार । दि.16 । प्रतिनिधी-वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठयामध्ये अडचणी येत असल्यामूळे राज्यात तात्पूरते भारनियमन करण्यात येत आहे.

यासाठी कोळशाची निर्यात करण्याचा विचार राज्य सरकारने केला आहे. त्यामुळे येत्या आठवडयात जलविद्युत प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु होवून भारनियमनाचा प्रश्न मिटेल, अशी माहिती उर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ना.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील पाडे, वस्त्या व दुर्गमभागाच्या ठिकाणी अद्याप वीज पोहचली नाही. या पाड्यांचा शासनाच्या पावर ऑफ ऑल योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील लोंबकळणार्‍या तारा, घरावरील गेलेल्या तारा, रस्त्यावरील अपघात ठिकाणचे पोल व डीपी स्थलांतरित करण्यासाठी पाहणी करुन प्रस्ताव सादर करावे व असे पोल व डिपी स्थलांतरीत करण्याच्या सुचना आपण दिल्या आहेत.

वीज कामासाठी कर्मचारी व अभियंत्यांनी ग्राहकांना पैशांची मागणी केल्याप्रकरणी चौकशी करुन काहीना तात्काळ निलंबीत करण्याचे आदेश देण्यात आले.

जिल्हयातील एक लाईनमन व एक कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहेत. तर खोटी माहिती पुरविल्याने एका अभियंत्याची वेतनवाढ रोखण्यात येवून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.

गेल्या तीन वर्षामध्ये जिल्ह्यात करण्यात आलेले देखभाल व दुरुस्तीच्या कामाचे दक्षता व सुरक्षा विभागामार्फत चौकशीचे आदेश दिले. कर्मचार्‍यांनी मुख्यालयी रहावे.

अभियंत्यांनी मुख्यालयी राहून दरमहा वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी ग्राहक सुसंवाद मेळावे आयोजित करावे. जिल्ह्यातील 33 केव्ही उपकेंद्राना कॅपॅसिटर लावण्याबाबत सूचना केली.

दीनदयाल योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालिल कुटूंबाना 15 रुपयात वीज जोडण्या देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

महिनाभरात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ग्राहक मोबाईल अ‍ॅपवर आणण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकार्‍यांना दिले आहेत.

राज्यात कृषिपंपासाठी ज्या ठिकाणी स्वतंत्र वाहिन्या उभारल्या आहेत व ज्या ठिकाणी सिंगल फेजिंग योजना आहे अशा वाहिन्यांवर सद्यपरिस्थितीत दिवसा 8 तास व रात्री 8 तास अशा दोन टप्प्यांमध्ये चक्राकार पध्दतीने रात्री 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यन्त अखंडित वीजपुवठा करण्यात येत आहे.

विजेच्या उपलब्धतेत सुधारणा होताच कृषिपंपांना दिवसा 8 तास व रात्री 10 तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे.

विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करीत असून लघु निविदेद्वारे खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्यात येत आहे.

याशिवाय पॉवर एक्सचेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे येत्या आठवडयात भारनियमनापासून नागरिकांना सुटका मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

*