लोकसहभागातून ब्रिटीश बंधार्‍याचे पुनरुज्जीवन

0
शशिकांत घासकडबी,नंदुरबार / पाण्याचे दुर्भिक्ष्य हा सर्वत्र चिंतेचा विषय बनलेला आहे.
शेती सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नागरीक व शेतकरी हवालदिल होत असल्याची स्थिती जवळपास प्रत्येक जिल्ह्यात दिसून येत आहे.
परंतू अशा भीषण परिस्थितीत सर्व गावातील लोकांनी एकत्र येवून पुढील वर्षाच्या पाण्याचे नियोजन लोकसहभागातून केले तर तो एक नक्कीच सर्वांसाठी आदर्श ठरतो.
असाच आदर्श नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले खुर्द व दहिंदुले बु। या दोन गावातील नागरीकांनी सर्व मतभेद विसरुन एकत्र येवून निर्माण केला आहे.

दहिंदुले गावात 100 वर्षापूर्वी ब्रिटीशांनी बांधलेला बंधारा लोकसहभागातून पुनरुज्जिवीत करुन एक कोटी लिटर पाणी साठण्याची क्षमता असणारा तलाव या दोन्ही गावातील गावकर्‍यांनी निर्माण केला आहे.

दहिंदुले ग्रामस्थांचे हे कार्य असंख्य गावांना प्रेरणा देणारे ठरणार आहे.

दहिंदुले हे गांव नंदुरबारपासून 5 ते 7 कि.मी. अंतरावर असून या गावात 100 वर्षापूर्वी ब्रिटीशांनी एक वळण बंधारा बांधलेला होता.

नंदुरबार तालुक्यातील चौपाळे (नागझरी) येथून उगम पावलेल्या सुकळ नदीवर हा बंधारा बांधण्यात आला. त्यावेळी या बंधार्‍यातून धामडोद गावापर्यंत पाणीपुरवठा होत असे.

या परिसरातील सर्व विहिरींना वर्षभर सिंचनासाठी पाणी पुरेल एवढा जलसाठा होता. परंतू कालांतराने पाण्याची पातळी खालावत गेली.

बंधार्‍यात गाळ साचत गेल्याने बंधारा व त्यातील झरे बुजले गेले. गावातल्याच काही जणांनी तेथे शेती करणे सुरु केले. त्यामुळे या भागात तलाव असेल अशी कल्पनादेखील गावकर्‍यांना येत नव्हती.

परंतु जुन्या जाणत्या लोकांनी याबाबतची माहिती दिल्याने मागील वर्षी 2 किमी. अंतरावर असलेल्या बाजूच्या पातोंडा गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून जलसंधारणातून काम केले आणि दहिंदुले ग्रामस्थांनादेखील आपल्या गावात अशा प्रकारचे काम व्हावे असे वाटू लागले.

अनुलोम या स्वयंसेवी संस्थेच्या काही कार्यकर्त्यांशी गावकर्‍यांचा संपर्क आला व त्यांनी या गावात असलेला प्राचीन बंधारा पुनरूज्जीवीत करण्याचा संकल्प केला.

सर्वप्रथम दहिंदुले बु। व दहिंदुले खुर्द या गावातील लोक वेगवेगळी राजकीय पार्श्वभूमी असतांनादेखील एकत्र आले व जलसंधारण समिती तयार करण्यात आली.

या जलसंधारण समितीत दहिंदुले बु।. चे सरपंच रमेश वसावे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंधारण समिती तयार करण्यात आली. दहिंदुले खुर्दचे सरपंच बन्या ठाकरे हेदेखील या जलसंधारण समितीमध्ये कार्यरत आहेत.

या कामासाठी सर्वप्रथम जलसंधारण समितीने लोकवर्गणी जमविण्याचे आवाहन केले. त्यातून 70 हजार रुपये जमा झाले.

सरपंच रमेश वसावे व उपसरपंच दिपक मराठे यांनी प्रत्येकी 11 हजार रुपये लोकवर्गणी दिली. तर गावातील लोकांनी बाकीचे पैसे जमा केले.

या तलावाच्या खोदकामात निघालेला गाळ व मुरुम गावातल्याच लोकांनी विकत घेऊन लोकवर्गणीत आपला सहभाग दिला. गावातील 70 ते 75 शेतकर्‍यांनी हा गाळ विकत घेतला.

जवळपास 3 हजार ट्रॉली गाळ विकण्यात आला. यातून या समितीला 1 लाख 10 हजार रुपये मिळाले. आतापावेतो एकूण 1 लाख 66 हजार रुपये या कामावर खर्च करण्यात आले आहेत.

30 हजार रुपये रा.स्व.संघाच्या ग्रामविकास विभागाकडून गावाला मदत स्वरुपात देण्यात आले. 18 हजार रुपये अजून या कामाचे देणे आहेत. केवळ 2 दिवसाचे काम अद्याप बाकी आहे.

वर्षप्रतिपदेला हे काम करण्याचा संकल्प गावाकर्‍यांनी केला. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर कामाचा शुभारंभ 18 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.

या कामासाठी 2 जेसीबी मशीन लावण्यात आले होते. 12 दिवसात 1320 लीटर डिझेल या कामवर खर्च करण्यात आले. कामाच्या योग्य नियोजनामुळेच हे काम वेगाने पूर्ण करण्यात आले आहे.

मजूरी काम गावातील लोक श्रमदानानेच करत आहेत. 12 दिवसात 135 मीटर लांबीचा, साडे 26 मीटर रुंदीचा व अडीच मीटर खोल असा हा बंधारा तयार होत असून भविष्यात या बंधार्‍याची क्षमता जवळपास 1 कोटी लीटर पाणी साठवण्याची असेल, असे जलसंधारण समितीतील लोकांनी सांगितले.

या तलावातून जो मुरूम निघाला तो शेतकर्‍यांनी खरेदी करुन शेताची बांधबंधिस्ती केली. तसेच शेताकडे जाणारे रस्ते मुरूम टाकून व्यवस्थीत केले.

तलावाचे गेट पूर्णपणे बंद करण्यात आले. हे काम सुरू असतांना बंधार्‍यावर काम करणार्‍या लोकांसाठी थंड पाण्याची व्यवस्था गावकर्‍यांनी केली होती.

जिल्हाधिकार्‍यांनी 10 मे रोजी पुन्हा एकदा या कामाला भेट दिली. प्रशासनातील अनेक अधिकारी तहसीलदार नितीन पाटील, अनुलोम संस्थेचे प्रमुख सारंग ओक, योगेश गर्गे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख दहातोंडे, जलतज्ञ जयंत उत्तरवार आदी अनेक मान्यवरांनी या कामाला भेट देवून मार्गदर्शन केले.

अनुलोम संस्थेचे जिल्हा प्रमुख कल्पेश पाडवी व तालुका प्रमुख उमेश शिंदे यांनीदेखील ग्रामस्थांना वेळोवेळी सहकार्य केले. गेल्या काही वर्षात गावातील कूपनलिकांची पाण्याची पातळी 750 फुटापर्यंत खाली गेली होती. तर विहिरींची 70 फुटापर्यंत खालावली होती.

या कामामुळे ही पाण्याची पातळी वाढण्यासदेखील निश्चितपणे मदत होईल व या परिसरात पिण्यासाठी तसेच शेतीसाठी वर्षभर पाणी उपलब्ध होईल, असा विश्वास दहिंदुले बु।.चे सरपंच रमेश वसावे, उपसरपंच दिपक मराठे, दहिंदुल खुर्दचे सरपंच बन्या ठाकरे, उपसरपंच राजेंद्र राजपूत प्रमोद साळुंके, कैलास माळी यांनी व्यक्त केला.

हे काम यशस्वी करण्यासाठी ग्राम जलसंधारण समितीचे सदस्य, दोन्ही गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, विशेषतः तरुणांनी विशेष सहकार्य केले.

कृषी विज्ञान केंद्र कोळदे यांनी तांत्रिक सहकार्य उपलब्ध करुन दिले. आर्ट ऑफ लिव्हींगतर्फेदेखील या कामाला अर्थसहाय्य देण्यात आले. या कामाचा सर्व गावांनी आदर्श घेऊल भविष्यात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करावी अशी अपेक्षा आहे.

 

LEAVE A REPLY

*