ठाणेपाडा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार

0

नंदुरबार । दि.13 । प्रतिनिधी-तालुक्यातील ठाणेपाडा येथील ग्रामपंचायतीत शासकीय योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात येवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली आहे.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत होणार्‍या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करून ठाणेपाडा ग्रामपंचायतील ग्र्रामसेवकावर तत्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात आली.

तसेच अंगणवाडी बांधकामामधील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, घरकुल बांधकामामध्ये चेक काढण्यासाठी पैसे घेण्यात आले आहेत. ते कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आले.

वन पर्यटनाच्या कामामध्येदेखील आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. शौचालयांच्या कामांमध्ये लोकांकडून पैसे घेतले जात आहेत. ठाणेपाडा ग्रामपंचायतीमध्ये पेसा कायद्यानुसार आतापर्यंत मागील 3 ते 4 वर्षांपासून आलेला निधी कुठे-कुठे खर्च करण्यात आला आहे, याची सविस्तर कागदपत्रांसह सर्व माहिती मिळावी व साक्षांकीत प्रती सादर करण्यात याव्या.

13 वा वित्त आयोग आणि 14 वा वित्त आयोगांतर्गत मागील 2011 ते 2016-17 पर्यंत कशाप्रकारे आणि कोणते काम करण्यात आले, याचे साक्षांकीत प्रती मिळाव्यात.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत आतापर्यंत किती लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला याची यादी मिळावी. आजपर्यंत ठाणेपाडा गावात लोकशाही पद्धतीने आणि ग्रामसभेच्या नियमानुसार एकही ग्रामसभा झालेली नाही.

ग्रामपंचायतीअंतर्गत कार्यरत असलेले कर्मचारी वर्ग यांना आजपर्यंत कोणतेही ड्रेसकोड आणि इतर साधनसामुग्री देण्यात आलेली नाही व तो खर्च रजिस्टरवर दाखवण्यात आलेला आहे याची चौकशी करण्यात यावी.

ग्रामपंचायतीअंतर्गत आतापर्यंत किती घरपट्टी आणि पाणीपट्टी जमा झाली, याची सर्व माहिती देण्यात यावी. आतापर्यंत गावात जमा होणारी घरपट्टी आणि पाणीपट्टीची कोणतीही पोहोचपावती देण्यात आलेली नाही.

त्यामुळे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येते. याचीही चौकशी करण्यात यावी. ठाणेपाडा गावात एलईडी लाईट आणि गावातील ग्रंथालय याबाबतसुद्धा आर्थिक घोटाळा झालेला आहे. याचीही चौकशी करण्यात यावी.

ठाणेपाडा गावात काही गटारी व बंदिस्त गटारीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यासंदर्भात चौकशी करण्यात यावी. या कामांमध्ये बोगस साधनसामुग्री वापरण्यात आली आहे. याचीही चौकशी करण्यात यावी.

ठाणेपाडा गावातील स्मशानभूमीचे काम करण्यात आले आहे, त्या कामांची चौकशी करण्यात यावी. ठाणेपाडा ग्रामपंचायतीअंतर्गत अंगणवाडीमध्ये लाभार्थ्यांना सरकारी आदेशानुसार कोणतेही लाभ लाभार्थ्यांना देण्यात आलेले नाहीत.

याची रितसर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी. या संदर्भात जी तक्रार केलेली आहे, त्या संदर्भात सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य पूर्ण जबाबदारीने तक्रार व चौकशीची मागणी केली आहे.

निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य हाशिराम कासम माळचे, कैलास प्रभू पवार, मंगा बन्सी बागुल, ग्रामस्थ ताराचंद रतन सूर्यवंशी, विजय भटू पवार, गुलाब हिरामण गावीत, राजू पवार, दिनेश पवार, भटू सर्यवंशी, हिंमत गवळी, विजय पवार, कृष्णा कांबळे, रतन माळचे, राजिराम ठाकरे, अशोक ठाकरे, हरीराम पवार, रमेश ठाकरे आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

*