पैशाच्या वादातून सासर्‍याचा खून

0
मोदलपाडा ता. तळोदा । वार्ताहर-तळोदा तालुक्यातील श्रीकृष्ण खांडसरीजवळ काल झालेल्या खुनातील आरोपींना अवघ्या 24 तासात पकडण्यात पोलीसांना यश मिळाले. पैशांच्या वादातून जावयाने सासर्‍याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल सकाळी 10 वाजेच्या सुमारास तळोदा- अककलकुवा रस्त्यावर श्रीकृष्ण खांडसरीजवळ कपिल शंकरलाल वाणी यांच्या शेतात असलेला रखवालदार प्रकाश रूपजी पाडवी रा.अमोदा (ता. कुंकरमुंडा, गुजरात) याला श्रीकृष्ण खांडसरी जवळील शेतात अज्ञात व्यक्तींनी ठार मारले.

याबाबतची माहिती पोलीसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गावीत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तसेच स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक नवले हे देखील घटनास्थळी आपल्या पथकासह दाखल झाले.

जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. त्याच्या नातेवाईक जंगलसिंग पाडवी याने याबाबत फिर्याद नोंदवली. या गुह्याचा तपास तळोदा पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे यांच्याकडे देण्यात आला.

त्यांनी तातडीने सुत्र हलवून उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वावरे, पवार व अन्य कर्मचारी यांनी आजुबाजूचा परिसर पिंजून काढला व आपल्या बातमीदारांना पाठवून 24 तासाचा आत मयत प्रकाश रूपजी पाडवी याचा जावाई रंजीत गोविंद पाडवी याला अमोदा येथे अटक करण्यात आली.

आरोपी रंजीत याचा सासरा प्रकाश रूपजी पाडवी याला बैल घेण्यासाठी 52 हजार रूपये मागत होता व त्याचा तगादा त्याने लावल्याने त्याचा राग आल्याने लाकडी डेंगार्‍याने त्याचा खून करण्यात आला व त्याची कबुली त्याने दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

या खुनाचा तपासकामी पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक वावरे, पवार, असई संजय जोने, पो.कॉ. अधिकारी पाटील, महेंद्र जाधव, दारासिंग गावीत, दारासिंग वळवी, मोहन वळवी, सतिष ढोले, पोलीस नाईक रामदास पावरा, अमोल मराठे, युवराज चव्हाण, भटु माळी आदींनी पथकात काम केले.

 

LEAVE A REPLY

*