तळोदा शहरात हागणदारीमुक्त गाव राज्यस्तरीय समितीची भेट

0
मोदलपाडा, ता. तळोदा | वार्ताहर :  तळोदा शहरात हागणदारीमुक्त गांव राज्यस्तरीय समितीने विविध ठिकाणी भेट देऊन तपासणी केली. यावेळी स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पालिकेचे काम पाहून समितीने कौतुक केले.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान तळोदा शहरात राबविण्यात येत असून गांव हागणदारीमुक्त व्हावे यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी तळोदा पालिकेतर्फे केली. यात पालिकेमार्फत घराघरात वैयक्तिक शौचालये स्त्री पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली.

उघड्यावर शौचास बसणार्‍यांना प्रतिबंध करण्यात आला, त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत अनेक मार्गांनी शेवटी तळोदा पालिकेने तळोदा शहर हागणदारीमुक्त केले. म्हणून स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय समितीने तळोदा शहर हागणदारीमुक्त घोषित केले. त्याची तपासणी राज्यस्तरीय पथकाने आज केली.

या पथकात मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त दीपक पुजारी, धुळे मनपाचे सहा आयुक्त त्र्यंबक कांबळे, धुळे येथील पत्रकार दत्तात्रय बागुल यांचा समावेश होता. त्यांनी सकाळ पासूनच तळोदा शहरात विविध ठिकाणी भेटी दिल्या.

यात शहरातील नागरिकांच्या उघड्यावर शौचास बसण्याचा ८ जागा ज्यात खर्डी नदी, हातोडा रोड, बस स्थानकाजवळील परिसर, कॉलेज रोड आदी ठिकाणी भेट देऊन उघड्यावर शौचालय करणार्‍यांची व वैयक्तिक शौचालये सार्वजनिक शौचालये यांची सुद्धा पाहणी करीत पथकाने केली.

अनेक नागरिकांशी संवाद साधला व पालिकेने हागणदारीमुक्त गांव अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल पथकाने पालिकेचे कौतुक केले. यावेळी पालिका मुख्याधिकारी जनार्दन पवार, आरोग्य निरीक्षक राजेंद्र माळी व इतर पालिका कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*